करिअरनामा ऑनलाईन । शिवालीच्या घरची परिस्थिती (Success Story) तशी बेताचीच. पण तिला शिकून मोठं व्हायचं होतं. जीवतोड मेहनत घेवून शिवालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता तिने स्वतः अभ्यास करुन ही परीक्षा पास केली आहे. तिचे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निवड यादीत नाव झळकले आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
वडील सालगडी तर आई शेतमजूर
वणी तालुक्यातील पुरड (नेरड) येथे शिवाली तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे वडील गावातच एका शेतकर्याकडे सालगड्याचे काम करतात. शिवाली व तिचा भाऊ अजित लहानपणापासून हुशार होते. या दोघांनाही शिकवून मोठे करायचे असे स्वप्न वडील अनिल उलमाले व आई बेबी यांनी उराशी बाळगले. त्यासाठी आईसुद्धा मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत आहे.
पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली MPSC
जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असली की, कोणत्याही परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते या कृतीला अनुसरून शिवाली उलमाले हिने पहिल्याच (Success Story) प्रयत्नात MPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस उपनिरीक्षक पद पटकावले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवीपासून ती राजुरा येथे मामाकडे शिकायला गेली. तिथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून मुकुटबन येथील आश्रमशाळेतून पास झाली. याच कालावधीत गावातील अनुप दुबे हा एमपीएससी उत्तीर्ण होऊन विक्रीकर निरीक्षक म्हणून नोकरीला लागला होता. त्याच्यापासून प्रेरणा घेत एमपीएससी उत्तीर्ण करण्याचे स्वप्न तिने बघितले.
यवतमाळ येथील महाविद्यालयातून बीएस्सी (गणित) पदवी मिळविली. सोबतच MPSCचा अभ्यासही केला. या कालावधीत अनुप दुबे यांच्याकडून मार्गदर्शन घेत राहिली. मैदानी चाचणीसाठी प्रा. दिलीप मालेकर यांचे मार्गदर्शन घेतले. ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ, पुंडलिक हरणे यांच्यासह मार्गदर्शकांना देते.
अभ्यास करताना हे करा (Success Story)
शिवालीने पहिल्याच प्रयत्नात पूर्व व मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. तिने अभ्यासादरम्यान अवांतर वाचनावर अधिक भर दिला. मुलाखतीसाठी वैभव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. सर्व टप्पे पार करीत पोलीस उपनिरीक्षकपदी तिची निवड झाली. तिचा भाऊ अजित हादेखील MPSCची तयारी करत आहे. परिश्रम करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि अवांतर वाचन महत्वाचे असल्याचा सल्ला शिवालीने MPSC परीक्षा देवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना दिला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com