करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव (Success Story) येथील एका छोट्या गावातील मुलगी श्वेता शेतकरी कुटुंबात जन्माला आली. मुळातच ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. शिकून मोठं व्हायचं, परदेशात जावून उच्च शिक्षण घ्यायचं स्वप्न तिनं उराशी बाळगलेलं. अखेर ते पूर्णही झालं. श्वेताने आर्टसमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. सायन्स, इंजिनियरिंग, मेडिकल सोडून आर्ट्स मधून करिअर होवू शकतं का? हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांनाच पडतो. पण या सगळ्याला फाटा देत श्वेताने महाराष्ट्र शासनाची फॉरेन स्कॉलरशिप मिळवली आहे. ते ही आर्ट्स शिकून. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 40 लाखाची ही स्कॉलरशिप श्वेताने पदरात पाडली आहे. तिच्या शिक्षणाचा लंडनमधील संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन उचलणार आहे. ती आता लंडनला जावून उच्च शिक्षण घेणार आहे. पिंपळगाव ते लंडन या प्रवासाविषयी करिअरनामा ने श्वेताशी केलेली खास बातचीत पाहूया…
शेतकरी कुटुंबातील कन्या
श्वेता विनोद पाटील ही जळगाव जिल्ह्याच्या पाचोऱ्या तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावातील रहिवाशी आहे. तिचे आई – वडील शेती करतात. श्वेताचे शालेय शिक्षण याच गावात झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला. तीने उच्च शिक्षणही पुण्यातच पूर्ण केलं आहे. सध्या ती तीन वर्षापासून वेगवेगळ्या NGO सोबत सामाजिक कार्य करत आहे.
शिक्षणाने वाट दाखवली
“खऱ्या अर्थाने शिक्षणाने वाट दाखवली. जी स्वप्नं बघायची हिमंत व्हायची नाही ती बघितली अन् आता पूर्णही होत आहेत याचा आनंद आहे. गावातल्या मुली, महिलांसाठी काम करायचं ठरवलं तेव्हा मी अकरावीत गेले होते. स्ट्रक्चरल काम बिम असे शब्द त्यावेळी आयुष्यात आले नव्हते. पण स्वतःसाठी अन् स्वतःसारख्या अनेकांसाठी संघर्ष करण्याची सुरुवात झाली.” असं श्वेताने करिअरनामाशी बोलताना सांगितले.
लंडनच्या नामांकित कॉलेजमध्ये मिळणार प्रवेश
या स्कॉलरशिप विषयी बोलताना श्वेता म्हणते; “मला सांगताना आनंद होतोय की मला महाराष्ट्र शासनाची fully funded फॉरेन स्कॉलरशिप 2023-2024 जाहीर झाली आहे. ह्या स्कॉलरशिप (Scholarship) अंतर्गत मी University College London (UCL) ह्या जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठात MA Education Gender and International Development ह्या मास्टर डिग्रीला प्रवेश घेणार आहे. ती पुढे म्हणते “लढण्याचं बळ मला घरातूनच मिळालंय. आतापर्यंत केलेलं थोडफार सामाजिक काम, कामातून आलेली समज घेऊन माझ्यासारख्या अनेक पोरींना स्वतःचं न्याय्य आणि सुरक्षित आभाळ मिळावं आणि त्या आभाळात त्यांना स्वतंत्रपणे हवं ते करता यावं, रंगीबेरंगी स्वप्नं बघण्याची संधी मिळावी या सगळ्यासाठी मी धडपडत राहणार आहे.”
युट्यूब वरुन केला अभ्यास
“माझ्यासाठी हा प्रवास फार अवघड नव्हता. आयुष्यात थोडा संयम (Success Story) राखला की आपल्याला जे हवं ते मिळवता येतं. स्कॉलरशिपसाठी अभ्यास करताना मी संयम ठेवला. कोणतेही कोचिंग क्लास न लावता मी सेल्फ स्टडीवर भर दिला आणि युट्यूबवर असलेल्या लेक्चर्स मधून शिकत गेले.”
आर्ट शिकतेय म्हणून गावानं हिणवलं
“मला दहावीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळाले होते. सायन्स किंवा इंजिनियरिंगला प्रवेश न घेता मी आर्टसला जाण्याचं ठरवलं. पोरगी अकरावीला आर्ट घेतेय म्हणून अनेकजण हिणवत होते. तेव्हा गावातून शिक्षणासाठी पुण्याला जाणाऱ्या पोरींची संख्या जवळ जवळ नव्हतीच. गेल्याच तर बहुतांश (Success Story) मुली इंजिनिअरिंगसाठी जात असत. एवढ्या दूर पोरी पाठवल्या तर त्या पळून जाऊन लग्न करतात ही भिती अनेकांच्या मनात होती. माझ्या घरची परिस्थिती बिकट असताना पोरीला आर्ट (Arts) शिकायला पुण्याला पाठवलं म्हणून आई वडिलांना अनेक तऱ्हेने लोक टोमणे देत होते. आर्ट शिकून खूप मोठं करिअर वगैरे होईल असं कोणाला वाटत नव्हतं. पण एक दिवस या सगळ्या बुरसटलेल्या विचारांवर पडदा पडला. स्कॉलरशिपचा निकाल हाती आला तेव्हा मी गावातच होते. माझा रिझल्ट गावाने सेलिब्रेट केलेला मी पाहिला. आपण कुठे होतो आणि कुठे आलो याची लख्ख जाणीव झाली.” अशा भावना श्वेताने करिअरनामाशी बोलताना व्यक्त केल्या.
आई-वडिलांनी हवं ते शिकू दिलं (Success Story)
श्वेताच्या सगळ्या प्रवासात तिच्या सोबत तिचे आई-वडील प्रत्येक वळणावर पाठीशी ठामपणे उभे होते. “माझे आई वडील काय प्रचंड ग्रेट आहेत हे जाणवत राहिलं. कुणालाच न जुमानता त्यांनी मला हवं ते शिकू दिलं. माझ्या वाटा शोधायला लागणारा मोकळा अवकाश अन् मला लागेल तेव्हा भक्कम आधार दिला.” असं श्वेता सांगते.
या सगळ्या प्रवासात श्वेताला ‘समता’ केंद्राने मोठी साथ दिली. या केंद्राचे संस्थापक प्रवीण निकम यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे श्वेताला इथ पर्यंतचा प्रवास पूर्ण करता आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समता केंद्र महाराष्ट्रभर काम करत आहे. इथे मिळणाऱ्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवून परदेशात जावून उच्च शिक्षण घेतले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com