करिअरनामा ऑनलाईन । अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी (Success Story) स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग असे यश संपादन करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रचंड प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पारगाव या गावची कन्या श्वेता बाबाभीम उमरे हिने असं यश संपादन केलं आहे त्यामुळे ती तरुणांसाठी प्रेरणा ठरली आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवताना खूप मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीचं फळ श्वेताला मिळालं आणि ती अधिकारी बनली आहे.
जिल्हा परिषद शाळेतून घेतलं शिक्षण
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पालगाव येथील एका लहानशा गावातील श्वेता. तिचं संपूर्ण शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. परिस्थितीचा बाऊ न करता यश मिळविणाऱ्या या विद्यार्थिनीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तीने 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘ग्रुप क’ मुख्य परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या श्वेता उमरे हीने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत अनेकांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे.
वडील शिक्षक तर आई गृहिणी (Success Story)
तिचे वडील निवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहे. आपलं ध्येय गाठण्यासाठी मोठ्या किंवा आधुनिक शाळेतच शिक्षण घेणं गरजेचं नाही; हे श्वेताने तिच्या कर्तृत्वातून सिध्द केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तिने चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले व त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपुर येथून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतरचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर या (Success Story) ठिकाणी घेतले व इलेक्ट्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या ठिकाणी पूर्ण केले.
श्वेताने अभियांत्रिकी परीक्षा अव्वल गुणांनी पास होऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तर मिळवला आहेच शिवाय तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क 2022 ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. खुल्या गटामधून 24 व्या तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तिने दुसऱ्या क्रमांकांने परीक्षा पास केली आहे. मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने तिने हे यश मिळवल्याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com