करिअरनामा ऑनलाईन । बारावीच्या पुरवणी परीक्षेत (Admission) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.ई/बी.टेक) आणि विधी (एलएलबी- पाच वर्ष) या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्था स्तरीय प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत मुदत दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात आली. परंतु पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीईटी सेलने व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.
तसेच, राज्यातील बहुतेक विद्यापीठांमधील पदवीसह तंत्रनिकेतन, तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया देखील बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाआधीच संपविण्यात आली (Admission) होती. परिणामी पुरवणी परीक्षा दिलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले होते. अखेर, याची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी यांची मुंबईत दि. २९ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असा आदेश मंत्री पाटील यांनी शिक्षण संचालकांना दिला.
या आदेशानुसार बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २२ हजार १४४ विद्यार्थ्यांना राज्यातील सर्व विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासह तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील औषधनिर्माणशास्त्र यासह अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, त्यानंतरही सीईटीत पात्र ठरलेल्या आणि पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी मिळणार का? असा प्रश्न समोर उभा ठाकला होता. या संदर्भात राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा हजारो विद्यार्थ्यांना लागली होती. विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.
बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (Admission) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि विधी (एलएलबी-पाच वर्ष) या पदवी अभ्यासक्रमांच्या संस्था स्तरीय प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमाच्या संस्था स्तरीय प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारपर्यंत (ता.१५ सप्टेंबर) मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com