Success Story : तब्बल अठरा वर्षांनी वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारी गृहिणी,‌ वाचा सविता शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजणं (Success Story) दररोज झटत असतात. प्रत्येक माणसाचे परिश्रम कोणापेक्षा कमी किंवा जास्त नाहीत. प्रत्येक माणूस स्वतःच्या संकटांशी झटत असतो. आजची गोष्ट अशाच एका महिलेची आहे जीने स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वयाचा विचार केला नाही. या विवाहितेने संपूर्ण घराची आणि दोन मुलांची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन वर्दी मिळवली आहे. दोन मोठ्या मुलांची आई आणि शेतकरी नवऱ्याची पत्नी आता ‘महाजेनको’ येथे सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळणार आहे.

10 वी परिक्षेत नापास
ह्या आहेत सविता रणजीत शिंदे. सविता यांचे माहेर आणि सासर दोन्ही बोरगांवच आहे. इयत्ता 10वीत असताना त्या नापास झाल्याने त्यांना अपयशाला सामोरं‌ जावं लागलं. घरच्यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना‌ पुढे वाटचाल करण्याची संधी मिळाली. इयत्ता बारावीनंतर त्यांचे लग्न रणजित शिंदे (Success Story) यांच्याशी झाले. रणजित शिंदे हे शेती करतात. सविता व रणजित शिंदे यांना दोन मुळे आहेत. मोठा पृथ्वीराज हा JEEची तयारी करत आहे तर धाकटा यशराज शिक्षण पूर्ण करत आहे.

पतीच्या पाठिंब्यामुळे शिक्षण पूर्ण करता आलं (Success Story)
सविता यांचे पती रणजीत यांना काही कारणास्तव शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण त्यांनी नेहमीच पत्नी सविता यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. माहेरच्या मंडळींनी सुध्दा किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यावं असा सल्ला दिला होता. मात्र सविता यांच्या मनात नेहमीच खाकी वर्दी धारण करण्याची इच्छा होती. सुरुवातीला त्यांना सुनील सत्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा मार्ग सुचवला. यानंतर त्यांना अभ्यासात अभिजीत शिंदे आणि अस्लम सुतार शिकलगार यांचे मार्गदर्शन लाभले.

18 वर्षांनी स्वप्न साकारलं
वैवाहिक आयुष्यातील संघर्ष सांभाळत तब्बल अठरा वर्षांनी त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आधी त्यांनी (EWS)आर्थिक मागासलेल्या वर्गातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला.‌ पण इथे इतर हजारो विद्यार्थी अगोदरच असल्याने त्यांना‌ काही संधी मिळाली नाही मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी खुल्या गटातून स्पर्धा परीक्षा दिली व या परिक्षेत त्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
पदवी घेतल्या नंतर PSI होण्याची इच्छा बाळगून सविता प्रयत्नशील होत्या. घरची जबाबदारी, संसार, दोन मुले यांचा सांभाळ करत, प्रसंगी शेती कामात मदत आणि जनावरांची निगा राखणे या सर्वांना तोंड देत सविता यांनी हे यश मिळवलं आहे.

परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही खडतर प्रवास करावा‌ लागला तरी देखील आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करता येते (Success Story) याचं उदाहरण सविता शिंदे आहेत. त्याचबरोबर यश हे कुठल्याही वयात मिळवता येतं‌ गरज फक्त मेहनतीची आहे; असा बोध त्यांच्या प्रवासातून प्रत्येकाने‌ घ्यावा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com