करिअरनामा ऑनलाईन । वन विभागाच्या परीक्षेदरम्यान (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. या परिक्षेत पुन्हा एकदा डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उघडकीस आलं आहे. वनविभागाच्या तपासणी पथकाने सतर्कतेने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे; त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
याप्रकरणी परीक्षार्थी उमेश संजय हुसे (आडगाव, छत्रपती संभाजीनगर), साहित्य पुरवठा करणारा बालाजी नामदेव तोगे (खोडेगाव, छत्रपती संभाजीनगर), एजंट राजू नांगरे आणि अजय नांगरे (दोघे काद्राबाद ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशा चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.
वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला; त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंद करण्यात आली. दरम्यान, चार दिवसांपूर्वी (Van Vibhag Exam) कॉपी उघडकीस आली. त्यानंतर काल डमी उमेदवारास रंगेहाथ पकडण्यात आले आणि आता डिव्हाईसद्वारे कॉपीचा प्रकार उघडकीस आला.
या सर्व प्रकारात छत्रपती संभाजीनगर कनेक्शन उघडकीस आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विश्रामबाग पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनरक्षक पदासाठी ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. सांगली ते मिरज (Van Vibhag Exam) रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीचा पेपर कालपासून सुरू आहे. दुपारी पेपर सुरू होण्यापूर्वी टीसीएस (TCS) कंपनीमार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी परीक्षार्थी उमेश हुसे याच्यावर संशय आला. त्यानंतर पथकाने कसून तपासणी केली.
त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात एक कम्युनिकेशन डिव्हाईस, मायक्रोफोन मिळून आला. हे साहित्य कॉपीसाठी बालाजी तोगे याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता एजंट राजू नांगरे आणि अजय नांगरे यांची नावे निष्पन्न झाली. त्याअनुषंगाने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उप वनसंरक्षक नीता कट्टे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल युवराज पाटील, दादा भाजबळकर व खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आता पुन्हा सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून उमेदवारांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.
कॉपीसाठी झाली दहा लाखांची ‘डील’
वनविभागाच्या परीक्षेत अत्याधुनिक डिव्हाईसद्वारे कॉपीचा प्रकार उघडकीस आला. नंतर सखोल तपास केल्यानंतर एजंट राजू नांगरे व अजय नांगरे, बालाजी तोगे यांनी संगनमताने कॉपीसाठी मदत करणार असल्याचे परीक्षार्थी हुसे याने कबुली दिली. त्या मोबदल्यात दहा लाख रुपयांची डील ठरवण्यात आली होती. परीक्षेनंतर हे पैसे दिले जाणार होते. छत्रपती संभाजीनगर येथील कनेक्शन वारंवार उघडकीस आल्याने मोठे रॅकेट यानिमित्ताने समोर येत आहे. याच्या मुळापर्यंत पोलिस जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न (Van Vibhag Exam)
सरकारी नोकरीसाठी जीवाचे रान करून आम्ही वर्षभर अभ्यास आणि मैदानी सराव करत आहोत. कॉपी, डमी उमेदवार अशांमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा यंत्रणेत तपासणी झाली पाहिजे, असे मत परीक्षार्थीने व्यक्त केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com