करिअरनामा ऑनलाईन । देश-विदेशात अनेक क्षेत्रात सातारच्या (Entrepreneur Success Story) तरुणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नव्या संसद भवनाच्या निर्मितीतही एका सातारकराला आपले योगदान देण्याची मोठी संधी मिळाली आणि या तरुणाने या संधीचं सोनं केलं. सातारकरांसह महाराष्ट्रासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.
पाटेघरचा तरुण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन संसद भवनाच्या इमारतीत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाचं प्रकाश मारुती शेलार असं नाव आहे. ते सातारा तालुक्यातील परळी विभागातील पाटेघर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास असतात.
स्टील फॅब्रिकेशन व्यवसायात नावलौकिक
गेली 20 वर्षे ते मेटल फॅब्रिकेशनच्या उद्योगात कार्यरत आहेत. मुंबईतील विविध नामवंत सिनेकलावंत, राजकीय व्यक्तींची घरे त्याचबरोबर भव्य इमारती, सिनेमागृहे, मॉल्स या ठिकाणी शेलार यांनी स्टील फॅब्रिकेशनच्या कामांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कामातील सुबकता, नावीन्यपूर्ण कलाकृती, वक्तशीरपणा या गोष्टींमुळे त्यांचा नाव लौकिकही सर्वदूर पोचला आहे. त्यातूनच गेल्या वर्षी त्यांना नवीन संसद भवनाच्या निर्मितीसाठी काम करण्याची संधी मिळाली. संसद भवनाच्या लोकसभा अन् राज्यसभेतील खासदारांच्या बाकावर असलेल्या नावाच्या पाट्या बनविण्यासह अन्य फॅब्रिकेशन कामांची जबाबदारी श्री. शेलार यांच्यावर सोपवण्यात आली.
…हे माझे भाग्यच
प्रकाश शेलार म्हणतात; “संसद भवनचे मुख्य कंत्राटदार नरसी इंटेरियर विभागाचे श्री. नरसी, कमल सुतार, दिनेश सुतार तसेच सहकारी संतोष कदम यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे मी हे काम वेळेत पूर्ण करू शकलो. नव्या संसद भवनाच्या निर्मितीत थोड्या प्रमाणात का होईना पण मला आणि माझ्या टीमला सहभागी होता आले; हे माझे भाग्य आहे. सातारकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.”
सामाजिक कार्याची आवड
श्री. शेलार हे व्यवसायानिमित्त मुंबईत असले, तरी आपल्या मुळ गावाकडे ते आपोआप ओढले जातात. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शेलार यांनी सातारकरांना एकत्र घेऊन ‘समर्थ प्रतिष्ठान’ची स्थापना केली आहे. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना ते या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवतात. तसेच ते मीरा-भाईंदर शहरात मनसेचे पदाधिकारी म्हणूनही जबाबदारी पार पाडताना दिसतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com