मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर शाळा सुरु राहणार की बंद याबाबत विद्यार्थी अन् पालक यांच्यात संभ्रम होता. मात्र यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यात आता 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण मोहिम सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत लस न देता त्यांना लसीकरण केंद्रावर नेऊन त्यांचे लसीकरण करण्याचा विचार आहे. तसेच राज्यातील शाळा अचानक बंद नाहीत करायच्या असा निर्णयही बैठकीत झाला आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात दोन दिवसांत करोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला.
काय आहेत नवे निर्बंध…
1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
आरोग्यमंत्र्यांचे आवाहन…
31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारे वर्ष असावे अशी सदिच्छा व्यक्त करतो. असे सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असे कुठलेही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले.
लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्यानं करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लर न घेतलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.’