करिअरनामा ऑनलाईन । दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत होणारे (10th and 12th Board Exam 2024) गैरप्रकार रोखण्यासाठी आता लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. यावर्षीपासून ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारीपासून 10 वी च्या परीक्षांना 1 मार्चपासून सुरुवात होत आहे. लवकरच दहावीचीही प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल. लेखी परीक्षेप्रमाणे या परीक्षांनाही भरारी पथकांकडून अचानक भेटी देण्यात येणार आहेत.
7 भरारी पथकांची स्थापना
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने 7 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा दक्षता समितीकडूनही त्या त्या जिल्ह्यात बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या स्थितीत यंदा प्रात्यक्षिक परीक्षेवरही कडक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. भरारी पथकांना या परीक्षांनाही भेटी देण्याचे आदेश दिल्याचे तेलंग यांनी सांगितले.
10 मिनिटांचा वेळ वाढवला (10th and 12th Board Exam 2024)
कोरोना काळानंतरही विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव अद्यापही कमी असल्याने राज्य मंडळाने यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त दहा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गैरप्रकार आढळल्यास महाविद्यालयावर कारवाई
दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहेत. विज्ञानाचे प्रयोग न घेता अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नयेत, यासाठी दाखले गोळा करून कॅटलॉगवर विद्यार्थीसंख्या दाखविली जाते, अशा तक्रारी आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास राज्य मंडळाकडून महाविद्यालयास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे; मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
10 वी परीक्षेसाठी 408 परीक्षा केंद्रे
दहावी परीक्षेसाठी ४०८ परीक्षा केंद्रे असून यावर्षी त्यात नव्या १३ केंद्रांची भर पडली आहे. यात लातूर जिल्ह्यात १५१, धाराशिव – ८९ तर नांदेड जिल्ह्यात १६८ केंद्रे असतील. दहावी (10th and 12th Board Exam 2024) परीक्षेसाठी तीन जिल्ह्यांतील मिळून एक लाख सात हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची जवळच्या केंद्रावर सोय करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com