स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | -नितिन बऱ्हाटे
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब 2020 पदांसाठी जाहीरात आली आहे,
एकूण पदे 806
PSI – 650 / STI – 89 / ASO – 67 पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2020
प्रत्येकाने आपापली अभ्यासाची रणनीती तयार केली असेल, पण ज्यांनी अजुन स्वतःला सावरलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सावरलं पाहिजे, यावेळेस जागा चांगल्या आल्या आहेत, मागील काही वर्ष महापरीक्षाच्या गैरव्यवहार, नोकरीची असुरक्षितता, मानसिक अस्थैर्य या गोष्टींतुन आपण आता बाहेर यायला पाहिजे येणारी “एक परिक्षा,एकच संधी आणि योग्य रणनीती” याआधारे यावर्षी स्वत:च्या नावापुढे शासकीय अधिकारी पदनाम लावुन घेण्यासाठी झटले पाहिजे, सदर लेखात ३ मे 2020 च्या PSI-STI-ASO संयुक्त पुर्व परिक्षेच्या तयारी बद्दल चर्चा करु
संयुक्त पुर्व परिक्षेसाठी “सामान्य क्षमता चाचणी”चा एक पेपर पदवी दर्जाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० प्रश्नांसाठी १०० गुणांचा असतो, विशेष आव्हानात्मक म्हणजे एक तासांचाच वेळ असतो, त्यामुळे आतापासूनच सर्व घटकांची योग्य तयारी प्रश्नपत्रिकांच्या सरावासहित असणे अपेक्षित आहे. संयुक्त पुर्व परिक्षेचा अभ्यासक्रम आणि आतापर्यंत विचारलेले प्रश्र्न पाहिले तर लक्षात येईल कि अभ्यासक्रम जेवढा सरळ, साधा आहे तेवढेच प्रश्र्न अवघड आणि किचकट विचारले जातात, तरी आपण अभ्यासक्रमाच्या घटकक्रमानुसार अपेक्षित प्रश्न आणि तयारी यांचे विश्लेषण करु कारण पुर्व परिक्षेचा अंदाज कधीच लावता येत नाही आपल्याकडे आयोगाचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका या दोनच गोष्टी असतात त्याच्याआधारेच पुढची दिशा ठरविता येते. प्रत्येक विषयाला सरासरी कोणत्याही क्रमाने 15 प्रश्र्न विचारले जातात, मागील संयुक्त पुर्व परिक्षांमध्ये अंदाजे पुढीलप्रमाणे प्रश्र्न विचारले होते
घटक आणि प्रश्नसंख्या
चालु घडामोडी -१५
इतिहास-१५
भुगोल -१५
विज्ञान-१५
राज्यशास्त्र आणि पंचायत राज-१०
अर्थव्यवस्था-१५
गणित आणि बुद्वीमत्ता चाचणी-१५
संयुक्त पुर्व परिक्षेसाठी 62 दिवस बाकी आहेत आणि एकुण ७ विषयांची तयारी करायची आहे, शेवटचा एक महिना संपुर्ण उजळणी व नमुना प्रश्नपत्रिका सरावासाठी ठेवणे अनिवार्य आहे. त्यासाठी अचुक नियोजन करावे लागेल . अभ्यासक्रमातील घटकानुसार पाहिले तर –
1. चालु घडामोडी:जागतिक तसेच भारतातील- मागील एक वर्षापासूनच्या चालु घडामोडीची विस्तृत तयारी आवश्यक आहे, यापुर्वीच्या परिक्षांना विचारलेल्या प्रश्नांचा प्रकार समजुन घेऊन तयारी करणे उचित राहील. “यशाची परिक्रमा” या मासिकांस विद्यार्थी अधिक पसंती देतात तसेच जोडीला उजळणी म्हणुन एखादं अद्ययावत पुस्तक(सिम्लीफाईड/अभिनव वार्षिकी) वाचलं तर योग्य राहील.या घटकांची तयारी नियमित असणे आवश्यक आहे , पैकीच्या पैकी मार्क्स देणारा विषय आहे.
2. “नागरिकशास्त्र:भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)”- हा अभ्यासक्रम असला तरी अजुन आव्हानात्मक प्रश्न विचारले जातात, निश्र्चित येणारे घटक आणि इतर घटक अशी सर्वांगीण संकल्पनात्मक तयारी करणे आवश्यक आहे. रंजन कोळंबे सरांचे पुस्तक आणि जोडीला एकनाथ पाटील (ठोकळा) अभ्यासक्रमाची गरज भागवतो. (एम.लक्ष्मीकांत जमल्यास वाचावे)सर्वच्या सर्व प्रश्नांचे गुण घेण्याची या विषयांत संधी आहे.
3. इतिहास:आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास- जास्त मेहनत आणि कमी गुण देणारा विषय आहे, ठराविक पुस्तकांतुन ऐतिहासिक घटनाक्रम आणि तथ्य पक्के करणे अपेक्षित आहे, महाराष्ट्र आणि भारत या दोन्हींना समान वेळ द्यावा, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11 वी चे क्रमिक पुस्तक आणि कटारे किंवा गाठाळ(पुर्वी वाचले असेल तर उजळणी म्हणुन) वाचता येईल, आणि भारताच्या इतिहास जुने 8 वी क्रमिक पुस्तकातुन व आधुनिक भारताचा इतिहास ज्या पुस्तकातुन(ग्रोव्हर/कोळंबे/महाजन) तुम्ही यापुर्वी वाचलय ते पुस्तक. भारताचा इतिहास वाचताना फक्त 1857 ते 1947 हा कालखंडच वाचावा, आणि समाजसुधारक म्हणुन आंबेडकर,शाहु, कर्वे, फुले आणि आगरकर ह्याविषयी विशेष वाचुन घ्यावे. एकनाथ पाटील संबंधित तयारीला जोडणी म्हणुन वापरता येईल.
4. भूगोल:(महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)पृथ्वी, जगातील विभाग,हवामान,अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. – जुन्या क्रमिक पुस्तकातील नकाशे आणि सवदी चा नकाशा याआधारावर संपुर्ण तयारी करता येईल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या तयारीसाठी जुन्या अभ्यासक्रमाचे 4थी आणि 9वी चे क्रमिक पुस्तक तसेच सवदी किंवा दीपस्तंभ किंवा खतीब वाचणे योग्य आहे, “मागील परिक्षेत भारताच्या भुगोलापेक्षा महाराष्ट्राच्या भुगोलावर जास्त भर दिल्याचे लक्षात येते”, भारताच्या भुगोलासाठी जुन्या अभ्यासक्रमाचे 8 वीचे पुस्तक आणि सवदी सरांचा भारताचा भुगोल(ठराविक घटक) करणे. एकनाथ पाटील पुस्तकातुन राहीलेल्या फॅक्ट्स पुर्ण करता येतील. भुगोल विषयाची क्रमिक(राज्य बोर्डाची) नवीन पुस्तके वाचणेही आता अनिवार्य आहे.
5.अर्थव्यवस्था:भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न,शेती, उद्योग,परकिय व्यापार, बॅंकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी,मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.शासकिय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प,लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.- “संकल्पनाचे चतुरस्त्र आकलन झाल्याशिवाय अर्थशास्त्राचे प्रश्न सोडविता येत नाहीत”, नवीन अभ्यासक्रमातील राज्य शासानाची पुस्तके, रंजन कोळंबे किंवा किरण देसले सरांच्या पुस्तकातुन संकल्पना स्पष्ट करुन घ्याव्यात, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे येणारे घटक आणि कमी महत्त्वाचे घटक याच्या नुसार अभ्यास करावा, संकल्पना आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न समजुन घेऊन तयारी करावी.
6.सामान्य विज्ञान:भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.- जुन्या अभ्यासक्रमाचे 8वी, 9वी 10वी ची क्रमिक पुस्तके आणि नवीन क्रमिक पुस्तके यातुन तयारी करावी(इंग्रजी तुन तयारी करणार्यांसाठी NCERTSचा पर्याय आहे) तसेच सचिन भस्के किंवा इतर संदर्भ ग्रंथामधुन संकल्पना स्पष्ट करुन घ्याव्यात. प्रश्र्नांची पद्धत व प्रकार समजुन घेणे आवश्यक आहे. विषय आव्हानात्मक असला तरी निदान जास्तीत जास्त गुण मिळतील अशी तयारी असावी.
7.बुद्धिमापन चाचणी:उमेदवार किती लवकर व अचुकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्र्न, अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी.- दररोज सराव करावा, मागील परिक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेल्या सर्व घटकांची जास्तीत जास्त उदाहरणांच्या आधारे तयारी करावी, उपलब्ध सर्व साहित्यामधी प्रश्न सोडविण्याचा अट्टाहास पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो, या विषयासाठी पेपर मध्ये वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाची नवीन अभ्यासक्रमाची क्रमिक पुस्तके ( 6-10 वी ) यातुन अभ्यास अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे कारण स्पर्धापरिक्षा दर मिनिटाला अपडेट होत असते येणारे प्रश्न ही अपडेटेड अभ्यासक्रमातुनच येतात.
भाषा विषयक अडचण – प्रत्येक विषयांतील महत्त्वाच्या संकल्पनांची इंग्रजी शब्दांची माहीती ठेवत रहा, तांत्रिक विषयांमध्ये(विज्ञान) भाषेची गल्लत होऊ देऊ नका. परिक्षेत भाषांतर योग्य नसल्यास पर्यायी भाषेचा आधार घेता आला पाहिजे त्यानुसार आतापासूनच दर्जात्मक तयारी करावी.
परिक्षार्थींच्या प्रकारानुसार –
1. यापुर्वी संयुक्त परिक्षेच्या अनेक मुख्य परिक्षा दिलेल्या परिक्षार्थींसाठी – संयुक्त पुर्व परिक्षेला बिलकुल ग्राह्य धरु नका, उरलेल्या दिवसात मुख्य चा संपूर्ण अभ्यास बाजुला ठेवला तरी चालेल, पुर्व निघाली तरच मुख्य देता येईल.
2. राज्यसेवा परिक्षार्थी साठी – राज्यसेवा परिक्षेवर पुर्ण फोकस असुद्या, 5 एप्रिलच्या रात्री गरजेनुसार संयुक्त पुर्व परिक्षेचा विचार करता येईल आणि उरलेल्या वेळेत नवीन घटकांची उदा. महाराष्ट्राची तयारी आणि इतर उजळणी करता येईल तोपर्यंत राज्यसेवेवरील लक्ष हटु न देणे कधीही उत्तमच.
3. फ्रेशर परिक्षार्थी – संपूर्ण ताकदीनिशी संयुक्त पुर्व परिक्षा द्या, पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण व्हा ,त्यातुन मिळणारा आत्मविश्वास पुढील यशासाठी उपयोगी पडेल.
MPSC च्या झालेल्या मुख्य परिक्षा आणि 5 एप्रिलची राज्यसेवा पूर्व परीक्षा यावरुन संयुक्त पुर्व परिक्षेच्या प्रश्नांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न नक्की करावा.
दररोजच्या दिनक्रमातील अभ्यासाची मांडणी पुढीलप्रमाणे ठेवता येईल –
A. गणित आणि बुध्दिमत्ता चाचणीचा प्रत्येकी एक घटक किंवा प्रत्येक घटकावरील किमान 10 उदाहरणे दररोज सोडविण्याच्या सरावासाठी किमान 2 तास (आयोगाचे प्रश्र्न प्रकार पाहत राहणे)
B. चालु घडामोडी साठी एक तास(नवीन आणि मागील उजळणी)
C. नियोजित एका विषयाचे विस्तृत वाचन, संकल्पना आणि तथ्यांची स्पष्टता करुन घेणे .सोबत मागील विषयाची उजळणी करीत राहणे.
D. मागील परिक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे प्रश्र्न वाचलेल्या घटकांनुसार विश्लेषण तसेच नवीन नमुना प्रश्र्न सोडविण्याचा सराव करणे.
दर रविवारी एखादी प्रश्नपत्रिका वेळ लावुन सोडविणे ,तसेच बाजारातील उपलब्ध सर्व प्रश्नपत्रिका आणुन अपेक्षित प्रश्न सरावादाखल वाचुन घेणे.
तुमचे अभ्याससाहित्य आणि वरील साहित्य यांची तपासणी करुन घ्या, आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकातुनच उजळणी करा वरीलपैकी एखादं नवीन वाचन वेळेत होणार असेल तरच वाचा, “स्वतःचा अभ्यास, पुस्तके आणि स्वत:वर कायम विश्र्वास ठेवा”.
– नितिन बऱ्हाटे
(9867637685)
(लेखक “लोकनीति IAS,मुंबई” चे संस्थापक/संचालक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)