करिअरनामा ऑनलाईन | दीक्षांत समारंभ म्हटलं की (UGC) आपल्या डोळ्यासमोर येतात अंगात सिंथेटिकचे चमकदार गाऊन आणि डोक्यावर हॅट घातलेले विद्यार्थी. पण आता हे चित्र पालटणार आहे. विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्थांमधील दीक्षांत समारंभात परिधान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना विशिष्ट पद्धतीचा ड्रेसकोड ठरवून दिला आहे. त्यानुसार दीक्षांत समारंभात आता विद्यार्थ्यांनी हातमागापासून तयार केलेले भारतीय कपडेच परिधान करावेत, असे निर्देश UGC ने दिले आहेत.
‘…विद्यार्थ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल’ (UGC)
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठे आणि राज्यांच्या कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे; “सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना विनंती आहे की, दीक्षांत समारंभाच्या ड्रेस कोडमध्ये भारतीय हातमाग किंवा हातमागाचा पोशाख समाविष्ट करावा. हातमागाचे कपडे प्रत्येक हंगामात आरामदायक असतात;असे कपडे परिधान केल्याने विद्यार्थ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. याशिवाय ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आपल्या राज्यांच्या पोशाखांना प्रोत्साहन देण्याच्या आणि दीक्षांत समारंभात त्यांचा समावेश करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयआयटी, एनआयटीसह (UGC) अनेक विद्यापीठांनी त्यांच्या राज्यातील पारंपारीक पोशाख परिधान करून पदवी प्रदान करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. याआधी २०१७-२०१८ मध्ये, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शैक्षणिक संस्थांना पारंपारिक काळ्या कोट ऐवजी भारतीय पोशाख परिधान करण्याचे निर्देश दिले होते. या मध्ये पुरुष कुर्ता-पायजमा किंवा धोतर घालू शकतात आणि महिला सूट-सलवार किंवा साडी घालू शकतात, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com