करिअरनामा आॅनलाईन | लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये काही नियम शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला आहे. युद्धपातळीवर काम सुरू झाले असून दहावीच्या 40-45 टक्के आणि बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. दहावीचा निकाल 20 ते 30 जुलै पर्यंत आणि 12 वीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पहिली ते दहवीची शाळा कधी सुरू होणार आहेत हे अद्याप निश्चित झालेलं नाही. सध्या अन्य राज्यातील स्थितीची माहिती घेतली जात आहे. काही प्रतिबंधित भाग वगळता 15 जूनपासून शाळा सुरू करता येतील का याबाबतही नियोजन सुरू आहे. शनिवारी (दि 6 जून) याबाबत बैठक झाली आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर आता शाळा नेमक्या कधी सुरू केल्या जाऊ शकतात याबद्दल सोमवारी (दि 8 जून) निर्णय दिला जाऊ शकतो. पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालये 1 सप्टेंबरपासून सुरू केली जातील असेही नियोजन सुरू आहे. विद्यापीठांना याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ आयोगानं पूर्वीच दिल्या आहेत.
काय म्हणाल्या मंत्री वर्षा गायकवाड ?
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 14 मे पासून उत्तरपत्रिका तपासणीला वेग आला आहे दहावीच्या 40 टक्के तर बारावीच्या 60 टक्के उत्तरपत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं आहे. कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून स्टाफ कमी ठेवला आहे. मुंबई, पुणे, सोलापूरसह, इतर भागात संसर्ग वाढत असल्यानं तिथलं उत्तपत्रिका तपासणीचं काम हे टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. बारावीचा निकाल 14 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच अकरावी प्रवेशाची प्रकिया सुरू केली जाईल. काही फेऱ्या कमी करत ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपवण्याचं नियोजन आहे. 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान त्यांचे कॉलेज सुरू व्हावे असेही नियोजन आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com