करिअरनामा । देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाउन होण्याआधीच दहावी आणि बारावीची परीक्षा झाली होती तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. निकाल लागण्याचा कालावधी निघून गेल्यामुळे निकालाबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर निकालाबाबतच्या चर्चेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला.
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी निकाल दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येतात. यावेळी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे निकाल उशिराने लागणार आहेत. त्यामुळे नेमके निकाल कधी लागतील, याकडे विध्यार्थी आणि पालक यांचे लक्ष लागले होते. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा निकाल ३१ जुलैपर्यंत तर बारावीचा १५ ते २० जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोली दौऱ्यावर असताना दिली. त्यांच्या या माहितीमुळे राज्यातील लाखो विध्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणूमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर घेण्यात आला नाही. भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या मार्कांची सरासरी काढून मार्क देण्यात येतील, असे ही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com