करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून (Talathi Bharti 2023) राहिलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालाविषयी एक महत्वाची अपडेट आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तलाठी परीक्षेचा निकाल लवकरच जाहिर होणार आहे. परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यावर उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. एकत्रित हरकती करून दि. 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना स्वतःचे गुण समजणार आहेत आणि गुणवत्ता यादी दि. 15 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात येणार आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेल्या तलाठी भरतीला चालना देत प्रशासनाने तलाठी पदासाठी नुकत्याच परीक्षा घेतल्या. आता प्रतीक्षा तलाठी परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची आहे. राज्यात 4 हजार 466 तलाठी पदांसाठी तब्बल 8 लाख 56 हजार उमेदवार परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 57 टप्प्यांत घेण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.
‘या’ तारखेपर्यंत नोंदवा हरकती (Talathi Bharti 2023)
परीक्षार्थींना उत्तरपत्रिकेबाबत हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे. येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहेत. हरकत नोंदविण्यासाठी १०० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले आहे. एकत्रित केलेल्या हरकती या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल. त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे; असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.
१५ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहिर होणार
तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील; असेही आनंद रायते यांनी सांगितले.
हरकतीचा विचार करुन उत्तरपत्रिकेत बदल होणार
उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास त्यानुसार (Talathi Bharti 2023) उत्तरपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. हरकतीसाठी घेतलेले १०० रुपये शुल्क संबंधित उमेदवाराला परत करण्यात येईल. राज्यपालांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ला उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे निश्चित केली जातील, असंही अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी सांगितलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com