करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti 2023) परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील का? असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी संपूर्ण राज्यभरात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. दरम्यान तलाठी पदाच्या परीक्षा फीवरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी सर्व्हरच डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे.
राज्यातील या केंद्रांवर परीक्षा खोळंबली (Talathi Bharti 2023)
अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती. सकाळी 9 ते 11 ही परीक्षेचे वेळ होती. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची नांव नोंदणी खोळंबल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत थांबावे लागले.
नागपूर येथील परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेचे प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. अनेक ठिकाणी परीक्षार्थ्यांनी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त केला.
विविध ठिकाणाहून आलेले विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते. काही तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा पुढील सत्रात घेतली जाईल; असं इथल्या कर्मचाऱ्यांनी (Talathi Bharti 2023) सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त झाला. यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com