करीअरनामा । प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याचा योग्य सन्मान आणि आदर केलाच पाहिजे अशा पद्धतीच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कृतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इस्लामपूरमधील वाळवा तहसील कार्यालयाच्या एका सुंदर व नव्या इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होते.
उद्घाटन झाल्यावर लगेच होणाऱ्या जाहीर सभेसाठी लोकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच इतर मंत्री व राज्यमंत्री यांच्या समवेत आगमन झाले आणि लगोलग हे सर्व जण तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या दाराजवळ गेले. फीत वगैरे कापून मग रितीप्रमाणे मुख्यमंत्री व सर्व मान्यवर या इमारतीतील दालनांची पाहणी करू लागले. वरच्या मजल्यावरच बैठक सभागृह पाहून मुख्यमंत्री सर्वात शेवटी खालच्या मजल्यावरील तहसीलदारांच्या दालनापाशी आले. इमारतीतील हे प्रमुख कार्यालयच असल्याने स्वाभाविकच आतमध्ये येऊन त्यांनी कार्यालयाची रचना पाहायला सुरुवात केली.
दालनात समोर तहसीलदारांची खुर्ची होतीच. त्यात थोडंसं बसून अचानक ते उठले आणि थोड्या दूरवर उभ्या असलेल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हाताला पकडून खुर्चीपाशी आणले आणि काही कळायच्या आत त्यांना फर्मावले, “तुम्ही तहसीलदार ना? मग ही खुर्ची तुमची आहे…बसा इथे” खुद्द मुख्यमंत्री असा प्रेमळ शब्दांत आदेश दिला. मात्र सोबत महसूल मधील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे साहजिकच गांगरलेल्या व सोबत वरिष्ठ अधिकारी असल्याने तहसीलदार सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना नम्रपणे मी एवढ्या मान्यवर व्यक्तीं समोर खुर्चीत बसू शकत नाही असे सांगितले.
मात्र मुख्यमंत्र्यांनी ठरवलेच होते, “ ही तुमची इमारत आहे, याठिकाणी तुम्ही प्रमुख म्हणून काम पाहणार आहात, ही तुमची खुर्ची आहे. या खुर्चीवर माझ्या हस्ते तुम्हाला स्थानापन्न करायचे आहे” असे मुख्यमंत्र्यांनी आग्रहाने सांगितल्यावर मग सबनीस यांचा नाईलाज झाला आणि ते त्या खुर्चीवर बसले. “या महत्वाच्या पदावर तुम्ही आहात. तुम्हाला मी स्वत: बसवले आहे. त्यामुळे काम पण चोखपणेच करा” असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांची पाठ थोपटली.
यावर तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी आपल्या भावना पुढील शब्दात व्यक्त केल्या, “मुख्यमंत्री उद्घाटन करून तिथून निघूनही गेले, पण तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा या नवीन दालनातल्या माझ्या खुर्चीवर बसतो, मला शेजारी राज्याचे मुख्यमंत्री खुद्द उभे आहेत असा भास होतो”.
वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन. या इमारतीतून शेतकऱ्याला व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम व्हावे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra @MahaDGIPR @Brijeshbsingh @InfoDivKolhapur pic.twitter.com/x7byVgWcIO
— DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI (@Info_Sangli) January 17, 2020