Success Story : एका झटक्यात मिळवली 2 पदे; 23 वेळा नापास झाला पण थांबला नाही 24व्या वेळी अधिकारी झालाच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । समाजात बरेच असे लोक आहेत (Success Story) ज्यांच्याकडून आपणास काही ना काही नवीन शिकायला मिळते. नांदेडच्या एका तरुणाने असाच एक अनुभव दिला आहे जो आयुष्यभर लक्षात राहील. संघर्षाच्या काळात त्याने परिस्थितीशी दोन हात करत स्पर्धा परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे; या तरुणाने सलग 23 वेळा स्पर्धा परीक्षा दिल्या. यामध्ये त्याला वारंवार अपयश आले. पण त्याने हार मानली नाही. त्याने पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला आणि 24 व्या वेळी त्याला मोठं यश मिळालं आहे. यावेळी त्याची एक नव्हे तर चक्क दोन पदांवर वर्णी लागली आहे.

छोट्या गावातील रहिवासी
सागर शिंदे असं या तरुणाचं नांव आहे. तो नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील माटाळा इथला रहिवासी आहे. त्याची मंत्रालयातील लिपीक आणि कर सहाय्यक अधिकारी या दोन्ही (Success Story) पदासाठी निवड झाली आहे. पण सागरने कर सहाय्यक अधिकारी पदाची नोकरी स्विकारण्याचा  निर्णय घेतला आहे.
सागरने लहानपणापासून शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्याने यासाठी तब्बल 23 वेळा स्पर्धा परीक्षा दिली. तो  पूर्व परीक्षेत पास व्हायचा पण मुख्य परिक्षेत त्याला यश मिळत नव्हते. मुख्य परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून खचून न जाता त्याने जिद्दीने प्रयत्न सुरूच ठेवले आणि 24व्या प्रयत्नात त्याला एक नव्हे तर दोन पदे मिळवण्यात यश मिळालं आहे.

सलग 23 वेळा अपयशी
एमपीएससीच्या परीक्षेत तब्बल 23 वेळा अपयश आले तरी या बहाद्दराने प्रयत्न करणे काही सोडलं नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सागरने सात वर्षे संघर्षमय स्थितीत अभ्यास केला. त्यानंतर 24 व्या प्रयत्नात त्याने मंत्रालयातील लिपिक आणि कर सहायक अधिकारी अशा दोन्ही पदे पदरात पडली. अनेक तरुण अपयश आल्यानंतर टोकाचा निर्णय घेतात; या युवकांसाठी सागरचा हा संघर्ष प्रेरणादायी ठरणार हे निश्चित.

2016 पासून सुरु केला अभ्यास
सागरने 2016 पासून MPSC ची तयारी सुरु केली आहे. तेव्हापासून पूर्व आणि मुख्य परीक्षा देत 2023 साल उजाडलं. 2022च्या परीक्षेत त्याला यश मिळालं आहे. त्याचे पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माटाळा गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर पाचवी ते दहावी वळशी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात, अकरावी-बारावीचं शिक्षण कोपाडी येथील शिवाजी विद्यालय संस्था येथे, त्यानंतर (Success Story) यशवंत महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सागरच्या या यशानंतर गावकऱ्यांनी त्याचे मोठ्या थाटात स्वागत करत त्याच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. तो जिद्दीने अभ्यास करत राहिला आणि परीक्षा देत राहीला. अखेर त्याच्या मेहनतीचं चीज झालंय. थोड्या थोडक्या अपयशामुळे खचून जाणाऱ्या तरुणांसाठी सागरची ही कथा प्रेरणादायी ठरणार आहे.

सागर सांगतो….
“यश आणि अपयशाचा लपंडाव नेहमी सुरुच राहतो. अपयश आलं तर न डगमगता आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. यश नक्की मिळतं. माझ्यासारखी किती तरी मुलं आहेत, ज्यांना अनेकवेळा (Success Story) अपयश मिळालं आहे. कुणी 50 वेळा अपयशी झाल्यानंतर अधिकारी बनलंय, तर कुणी 25 वेळेस अपयश पचवलं आहे. अशातही न खचून जाता मेहनत करुन अनेकांनी यश खेचून आणलं आहे; तसंच माझंही आहे. घरची परिस्थिती सांगायची झाली तर अडीच एकर शेती आहे. या अडीच एकर शेतीत आई-वडिलांनी उदरनिर्वाह करुन मला पैसे पाठवले. त्यामुळेच मला अभ्यास करता आला आहे”, असं सागरने सांगितलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com