करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा या खूप मोठ्या स्पर्धेचे क्षेत्र आहे. यामध्ये नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. यामध्ये नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या ऐकून पण हि प्रेरणा मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज एक प्रेरणादायी प्रवास घेवून आलो आहोत. लहानपणीच पोलीओ झालेला रामू नावाचा एक मुलगा आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकून आयएएस अधिकारी कसा होतो, हा रामूचा जीवनसंघर्ष आपणास नक्कीच प्रेरणादाई ठरेल. चला तर मग जाणून घेऊ रमेश घोलप यांची संघर्षगाथा.
सोलापूरच्या बार्शी येथील रहिवाशी असलेल्या रमेश घोलप यांना लहानपणी पोलीओ झाला होता. तेंव्हा त्यांच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. दोन वेळेच्या जेवणासाठीही मोठा संघर्ष होता. पोटासाठी त्यांची आई रस्त्यावर फिरुन बांगड्या विकत असे. रमेश यांच्या वडीलांचे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान होते. त्यांच्या परिवारामध्ये चार सदस्य होते मात्र वडिलांना दारुचे प्रचंड व्यसन असल्याने संपुर्ण परिवार आर्थिक तंगीमध्ये आला होता. दारुचे व्यसन इतके वाढले की, त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. यामुळे परिवाराचा पोट भरण्यासाठी आईसोबत रमेश हे देखील बांगड्या विकण्यासाठी फिरु लागले. मात्र आपल्या मुलाने खुप शिकावे ही आईची ईच्छा होती. गावात प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर हायस्कुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी रमेश आपल्या काकांच्या गावी गेले. सन २००५ मध्ये रमेश जेंव्हा १२ वीत होते तेंव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काकांच्या गावापासून स्वत:च्या घरी जाण्यासाठी बसचे भाडे केवळ सात रुपये होते मात्र रमेश विकलांग असल्याने त्यांना केवळ दोन रुपये भाडे लागत होते. परंतू दुदैव्य इतके की त्यांच्या कडे दोन रुपये देखील नव्हते. तेंव्हा शेजार्यांच्या मदतीने रमेश वडिलांच्या अंत्यविधीला कशेबशे घरी पोहचले.
वडीलांचे छत्र डोक्यावरुन हरपल्यानंतरही त्यांनी १२वीत ८८ टक्के मिळवले. घरची जबाबदारी असल्याने डीएड करुन गावातल्या एका शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू देखील झाले. याचवेळी त्यांनी बी.ए.ची डीग्री देखील घेतली. आपला मुलगा खुप शिकला शिक्षक झाला याचे कौतूक आईसह गावकर्यांनाही होते मात्र रमेश यांचे लक्ष काही तरी वेगळेच होते. रमेश यांनी सहा महिन्यांकरीता नोकरी सोडून देत युपीएससीची तयारी केली.२०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही परीक्षा दिली तेंव्हा त्यांच्या पदरी निराशा पडली. मुलाची जिद्द पाहून आईने गावातून काही पैसे उसनवारीने घेतले त्यानंतर रमेश पुणे येथे जावून युपीएससीची तयारी करु लागले. यावेळी रमेश यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत ते मोठे अधिकारी होत नाही तो पर्यंत गावकर्यांना आपले तोंडही दाखविणार नाही.
प्रचंड इच्छाशक्ती व प्रामाणिक मेहनत काय करु शकते, याची प्रचिती २०१२ मध्ये आली. रमेश हे यूपीएससीच्या परीक्षेत २८७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कोणत्याही प्रकारच्या क्लासेसला न जाता महागडी पुस्तके न खरेदी करता गरीब व निरक्षर आई-वडीलांचा मुलगा आयएएस अधिकारी झाला. त्यांची पहिली पोस्टींग कुंती (झारखंड) येथे झाली. तेथे एक प्रमाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या सर्व मित्र/मैत्रिनींनो छोट्याशा अपयशाने खचून जाऊ नका, परिस्थितीचा बाऊ करु नका. तुम्ही अधिकारी होण्याचे जे ध्येय निश्चित केले आहे, त्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करा, यश तुमची वाट पाहत आहे याची नेहमी आठवण ठेवा.