शाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ झालाय !!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

गोष्ट जिद्दीची | वरचं टायटल वाचून अवाक झालात ना. पण हो. हे खरंय. एक अत्यंत उनाड, आगाऊ आणि खेळकर असणारा किरण गाढवे आज अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधे शास्त्रज्ञ म्हणुन काम करतोय. पुणे सातारा हायवेवरील पारगाव खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण. किरण याच खंडाळा गावचा राहणारा. त्याचे आई वडील आणि चुलते एकत्र राहतात, शेती करतात. किरण चे वडील कॉमर्स ग्रॅज्युएट. पण शेतीची आवड असल्यानं संपुर्ण आयुष्य त्यांनी शेतीला वाहुन घेतलं आणि कळत नकळतपणे त्यांनी किरणची जबाबदारी त्यांच्या भावाकडे सोपवली. पैलवान असणारे आणि पेशाने शिक्षक असणारे दत्तात्रय गाढवे हे किरणचे चुलते. बालवाडीतुन किरण मराठी शाळेत जसा आला. तसं तसं किरणच्या रोज काही ना काही तक्रारी येऊ लागल्या. याची खोडी काढ, त्याला काहीतरी म्हण,खेळताना पडणं तर रोजचच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास न करणं. मग तो नाही केला यासाठी रोज नवंनवी कारणे शोधणं. ती नाही पटवुन देता आली तर त्याहुन नवी सांगणं. पण अभ्यासाचं दप्तर मात्र किरण ने कधी आवर्जुन उघडलं नाही.

एकदा तर असं झालं की, त्याला शिकवणाऱ्या पिसाळ बाईंनी वर्गात सर्वांना गृहपाठ करायला दिला. दुसऱ्या दिवशी सर्वांनी गृहपाठ आणले पण याने लिहलाच नव्हता.त्यामुळे शिक्षा मिळण्याच्या भितीने त्याने कारण सांगितलं. बाईं आवो वही घरी विसरली. पिसाळ बाईंनी त्याला घरुन वही आणायला सांगितली. मग काय.. किरणला निमित्तच पाहिजे होतं. किरण त्या दुपारी घरी न जाता एका दुकानाच्या वर जाऊन निवांत बसला. आणि दुपारी जेवायची सुट्टी झाली की घरी पोहोचला. अन समोर पाहतो तर बाई घरी येऊन घरच्यांशी गप्पा मारत बसलेल्या. आणि जसा तो आत आला तसं बाई विचारत्या झाल्या. दाखव कुठय गृहपाठाची वही. त्यानंतर किरणला घरच्यांकडुन ही खोटे बोलण्याची शिक्षा मिळाली.

जिथं सोबतची अनेक मुले–मुली रोज अभ्यास आवरुन शाळेत पोहोचायची. तिथं रोज रोज शाळेत का जायचं असतं असं त्याला वाटायच!! घरच्यांसमोरुन सकाळी शाळेला जायला तर निघायचं. पण मधुनच त्याची पावलं त्याच्या ठरलेल्या दुकानाच्या टेरेसकडे वळायची. तिथे मग हा निवांत बसायचा. कधी रानात वेळ घालवायचा. तर कधी दुसरीकडे. पायाला अखंड भिंगरी. एका जागेवर थांबणे नाही. त्यामुळे कोण शोधायला आलं तर, अहो आत्ता तो इथं दिसला. बहुतेक तिकडं गेला असलं. तिथ गेलं तर तोपर्यंत त्याचे लोकेशन अजुन कुठेतरी बदललेले असायचे.

आसपास चे मित्र चांगले मार्क मिळवत होते. पण किरणचा आलेख जैसे थे च होता. चौथी पास होत तो खंडाळ्यातीलच राजेंद्र विद्यालयात आला. चुलते त्याच हायस्कुल ला शिकवायला होते. तरीही त्याच्या अवखळपण अन चंचलतेत बदल नव्हता. एकदा तर त्याची आई वैतागुन म्हणाली मी तर दमले याच्या अवखळपणाला.. हे ऐकुन शेजारच्याच हरुनभाईंनी किरणला त्याचे हातपाय बांधुन कॉट ला बांधुन ठेवला. करशील का आगावपणा.. देशील का आई वडिलांना त्रास असं म्हणत काही वेळ त्यांला तसाच बांधुन ठेवलेला. मात्र नंतर पुन्हा जैसे थे. गल्लीबोळातुन किरण पुन्हा वाऱ्यासारखा आत्ता इथं तर नंतर तिथं अस चालुच राहिले. पण असं असलं तरी त्याला विज्ञान विषय खुप आवडायचा. बाकी विषयात मार्क कमी जास्त असले तरी विज्ञानात तो टॉपर रहायचा.
आसपासच्या मित्रांच्या गर्दीत जरी तो पहिल्या दहा पंधरात नसला तरी विज्ञानात मात्र तो नेहमी सजग असायचा. एकदा सरांनी कुठल्या एका परिक्षेचे पेपर वर्गात दिले. सर्वांना चांगले मार्क पडले. किरण त्यात थोडा मागे राहिला. आणि तेव्हा पहिल्यांदा त्याला जाणवलं. आपलं अभ्यासावर लक्ष कमी होतय. सगळे पुढे चाललेत. आणि आपण हळुहळु मागे राहत चाललोय. ही भावना अचानक कशी आली याचं उत्तर किरण देऊ शकत नाही असं तो म्हणतो. पण त्याला तेव्हा वाटलं की नाही. आपल्या स्वभावाला आपण कुठेतरी बांध घालायला हवा. आणि त्यानंतर तो अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागला.

लहानपणी केलेल्या चुका, घरच्यांनी व पिसाळ बाईंनी त्या चुका सुधारण्यासाठी केलेले कष्ट, दिलेला वेळ,शिक्षा, प्रसंगी पाठीवरुन फिरवलेला मायेचा हात. ह्या सर्व गोष्टींची त्याला जाणिव व्हायला लागली. आणि दिवसेंदिवस किरण शांत होत गेला. दहावीत असताना एकदा तो विज्ञान शिकवणार्या मॅडमच्या वह्या आठवीच्या वर्गात द्यायला गेला तेव्हा त्या मॅडमनी आठवीतल्या विद्यार्थ्यांना सांगितलं. हा किरण. याला विज्ञान विषय खुप आवडतो. मार्क चांगले असतात याला.भविष्यात हा शास्त्रज्ञ ही होऊ शकतो. असं म्हणुन त्या पुन्हा शिकवायला लागल्या. पण याच्या डोक्यात मात्र तो शास्त्रज्ञ शब्द काही केल्या स्वस्थ बसु देत नव्हता. त्या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या त्याच्या बहिणीने संध्याकाळी घरी सांगितलं की दादाला मॅडम शास्त्रज्ञ म्हणल्या. त्यानंतर पुढचा महिना दिड महिना घरचे आणि वर्गातील मित्र त्याला विनोदाने चेष्टेने शास्त्रज्ञ असे म्हणायला लागले.

पुढे दहावी होत अकरावीला अर्थातच त्याने सायन्स ला प्रवेश घेतला होता. घरची शेती असल्याने व त्याची आवड ही असल्याने किरण ने अॅग्री विषय घेत बारावी पुर्ण केली. अॅग्री शिकवणार्या इंदलकर सरांमुळे त्याची त्या विषयातली गोडी अजुन वाढली हे ही तो नमुद करतो. पुढे राहुरीमधे बी.एस.सी.ला प्रवेश घेत त्याने आता अभ्यासात अजुन जीव ओतला होता. लहानपणी मी इतका आगाऊ होतो, धडपड्या होतो. आता माझ्यात इतका बदल कसा काय..हे तो अधुन मधुन स्वत: ला विचारत होताच. मात्र या आगाऊपणात दुर्लक्षित झालेल्या आत्तापर्यंतच्या अभ्यासाचा बॅकलॉग त्याला इथुनपुढे भरुन काढायचा होता. पुर्ण तयारीनिशी तो अभ्यासात गढुन गेला. किंबहुना त्याने स्वत: ला त्यात गुंतुन ठेवलं. मात्र इतकं करुन ही त्याला दोन सेमिस्टर मधे 75% मार्क मिळाले. त्यामुळे त्याच मन पुन्हा खचलं. तो त्या सेमिस्टरनंतर रडायला लागला. कारण 75% पेक्षा जास्त त्याला मार्क पडायला हवे होते. त्याचं स्वत:चे टारगेट हे 80% च्या वर होते. पण कमी मार्क मिळाल्याने तो नाराज झाला होता. कधीकाळी अभ्यास न करणारा, दप्तराकडे ढुंकुन ही न पाहणारा, शाळेत जायचं नाही म्हणुन दप्तर गंजीमधे लपवणारा किरण आता मार्क कमी पडतायत या विचाराने रडत होता. त्या सेमिस्टर नंतर त्याने अभ्यासाच्या पद्धतीत बराच बदल केला. आणि पुढच्या सेमिस्टरमधे तो टॉप टेन मधे येऊन पोहोचला.

परदेशातल्या शिक्षणाचा सुरु झालेला प्रवास – बी.एस.सीच्या तिसर्या वर्षात असताना त्याने ठरवले होते की रिसर्च मधे आपल्याला काम करायचे आहे. म्हणुन त्याच तिसर्या वर्षी किरण ने ICR ची परिक्षा दिली. ही परिक्षा म्हणजे एम.एस्सी प्रवेशाची परिक्षा असते. तुम्ही अॅग्रीकल्चरमधील एक विषय निवडायचा स्पेशलायजेशनसाठी. आणि त्याचा अभ्यास करुन ती परिक्षा चांगल्या मार्काने पास झाला तरच पुढे भारतातल्या उत्तमोत्तम अशा युनिवर्सिटीत प्रवेश मिळु शकणार होता. त्यातुन ही देशातुन परिक्षेला बसणार्या वीस तीस हजार विद्यार्थ्यातुन वीस किंवा पंचवीस विद्यार्थीच निवडुन त्यांना फेलोशिप मिळणार असल्याने मार्ग खडतर होता. एका महत्वाच्या टप्प्यावर किरण उभा होता. भुतकाळातला आणि वर्तमानातला किरण जमीन अस्मानचा फरक होता. आणि याच बदललेल्या त्याच्या वर्तमानावर त्याचं भविष्य अवलंबुन होतं. किंबहुना ते त्याची वाट पाहत होतं. या परिक्षेचा अभ्यास सुरु झाला. आजपर्यंत मी कधीच इतका अभ्यास केला नव्हता इतका अभ्यास मी या परिक्षेसाठी केला असं तो म्हणतो. बघता बघता किरण या परिक्षेत भारतात 24 वा आला. विशेष असं की पंचवीसाव्या रॅंक ला फेलोशिप क्लोज झाले!! तिथं ही त्याला नंतर वाटले की यात अजुन आपल्याला चांगले मार्क पाडता आले असते. पण खरी मजा तर पुढे होती. किरण भारतात चोविसावा आला होता.तरी ही तो स्वत:च्या रॅंकवर नाराज होता. आता एम.एस्सीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. कोईम्बतुरच्या विद्यापीठात त्याचा नंबर लागला. मात्र नंतर त्याला समजलं की त्या विद्यापीठात त्या पंचवीसमधे जी पहिल्या क्रमांकाची मुलगी होती, ती आणि किरण, या दोघांनाच प्रवेश मिळालाय. किरण म्हणतो माझा भारतात कुठेही क्रमांक आला असता तरी मी परदेशात गेलो असतोच पण कोईम्बतुरच्या विद्यापीठात प्रवेश मिळणं ही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट होती.

घरच्यांचा भक्कम पाठिंबा – घरचे शेती करत असल्याने किरणकडे असणारं आई–वडिलांचे लक्ष होतं ही पण शेतातल्या जबाबदार्यांमुळे कळत नकळत त्यांनी मुलाची,शैक्षणिक, सामाजिक जबाबदारी त्यांच्या बंधुंकडे म्हणजे दत्तात्रय गाढवे यांच्याकडे सोपवली होती. किरण सांगतो की, वडिलांच्या धाकापेक्षा नानांचा म्हणजे त्याच्या चुलत्यांचा धाक जबरदस्त होता. त्याच्या लहानपणापासुनच नानांनी त्याच्या आगाऊपणामुळे त्याला धाकात ठेवलं होतं. शाळेतल्या पालक मिटिंग्ज असतील, तक्रारी असतील, कौतुक असेल, फी भरणं असेल,..हे सगळं नाना पाहत होते. शैक्षणिक क्षेत्र तसेच व्यक्तीमत्व घडवण्यात, वडिलांचा रोल नानांनी निभावला. तेव्हा नकोसा वाटणार्या धाकाचा मात्र आज खुप फायदा होतोय असं किरण अावर्जुन सांगतो.

परदेशातले शिक्षण – कोईम्बतुरमधे एंटमलॉजी विषयातुन किरणला दुसर्या एमएस्सी.साठी टाटांची फेलोशिप मिळाली. त्यातुन त्याला जगातल्या टॉप च्या कॉर्नेल युनिवर्सिटीत जायची संधी मिळाली. तिथे प्लांट रिडींग एण्ड जेनेटिक्समधुन दुसरी मास्टर्स केली. पण पुढे किरण समोर दोन पर्याय होते. शेवटी त्याचा आवडता विषय एंटमलॉजी म्हणजेच किटकशास्त्र हा विषय निवडत युनिवर्सिटी ऑफ लंडन येथे त्याने पीएच.डी. पुर्ण केली. तिथे ही त्याला स्कॉलरशिप मिळाली.आणि किरण युएसमधे आला. तिथुनपुढचा प्रवास आता शास्त्रज्ञ म्हणुन तीन ही वेगवेगळ्या विद्यापीठातुन, पहिली दोन वर्षे युनिवर्सिटी ऑफ जॉर्जिया, पुढचे अडिच वर्षे नॉर्थ कॅरोलिना युनिवर्सिटी, आणि आत्ता तो युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे शास्त्रज्ञ या पदावर काम करत आहे. आणि त्यांची पत्नी ही कोरियामधे प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. किरण त्याच्या या सगळ्या विस्यमयकारी प्रवासाचे श्रेय घरच्यांसोबत त्याच्या सर्व शिक्षकांनाही देतोय.

WhatsApp Image 2020-08-31 at 6.38.34 PM

एक अत्यंत उनाडटप्पु, आगाऊ मुलाच्या आयुष्यात कालांतराने खुप छोट्या नी साध्या गोष्टी अशा घडतात की त्या त्याला स्वत:बद्दल विचार करण्यास भाग पाडतात. यानंतर त्याला ही जाणवतं की आपण बदल केला तरच काहीतरी होऊ शकतं. आणि गेलेल्या वेळेचा,न केलेल्या अभ्यासाचा,शाळेत मिळालेल्या शिक्षेचा, अपुर्ण गृहपाठाचा, घरच्यांची बोलणी खाल्ल्याचा, बॅकलॉग भरुन काढत आज एका शेतकरी कुटुंबातला किरण गाढवे अमेरिकेत शास्त्रज्ञ बनला.हे मुळातच अचंबित करणारं आहे. शाळेतली प्रगतीपुस्तकं मार्क सांगतात. मात्र प्रत्यक्ष अायुष्यातलं कष्टाचं प्रगतीपुस्तक हे ही तितकच महत्वाचं असतं. किरण याच कष्टाच्या जोरावर आज पुढे जात सर्वांनाच आशेचा, प्रगतीचा, नवा किरण दाखवतोय. त्याच्या अभ्यासु बोलण्याने अनेकांना तो मार्गदर्शक ठरतोय. काहितरी बनुन दाखवणार्या अनेकांच्या खांद्यावर तो हात ठेवत त्यांना पुढे चालण्याचं बळ देतोय, सोबती होतोय. त्याच्या घरच्यांना ही घामाचं फळ कालांतराने गोड असतच. याचा आनंद होतोय. अफाट कष्टाच्या जोरावर आणि कुटुंबाच्या भक्कम पाठींब्याने एका शेतकरी कुटुंबातला मुलगा शास्त्रज्ञ होतोय. हे चित्र आज अनेकांसाठी भरपुर काही सकारात्मक पेरुन जातय.

– विकी पिसाळ
9762511636

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.