परीक्षेपूर्वी वडिलांचे छत्र हरवले तरीही धीराने दिली परीक्षा; UPSC मध्ये देशात 18 वी येऊन बनली IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन । परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हीच गोष्ट दिल्लीच्या ऋषिताने सिद्ध केली आहे. जीवन म्हणजे अनिश्चितता असंच ऋषिता मानते. संघर्षाला न घाबरणारी ऋषिता हिने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. एका व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या ऋषिताच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी पोषक वातावरण होते. ऋषिता नेहमीच अभ्यासात हुशार होती त्यामुळे तिला डॉक्टर व्हायचं होतं. दहावीनंतर विषयांची निवड करण्याची वेळ आली तेव्हा तिने कठीण समजल्या जाणाऱ्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय निवडले. मात्र, याच दरम्यान तिच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. याचा तिच्या अभ्यासावर बराच परिणाम झाला.

दुःखाच्या डोंगरामुळे तिचा अभ्यास नीट झाला नाही आणि त्यामुळे तिला चांगले गुण मिळाले नाहीत. यामुळे त्या वर्षी गुणवत्ता यादीनुसार (मेरिट लिस्ट) ऋषिताला गुण मिळाले नव्हते. त्यामुळे नाईलाजाने ऋषिताला इंग्रजी साहित्यातून पदवीधर व्हावे लागले. पण त्याच वेळी तिने नागरी सेवा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ध्येय निश्चित केल्यानंतर तिने तयारीवर लक्ष केंद्रीत केले. २०१५ साली ऋषिताने निर्णय घेतला की ती यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) देईल. ऋषिताचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणं. एका मुलाखतीत ऋषिता म्हणाली की, मी स्वत: ला कधीही सांगितले नाही की आणखी संधी येतील. मी ठरवलं होतं की, मला सिलेक्ट व्हायचं ते पहिल्या प्रयत्नातच. ऋषिताने अभ्यास केला, नोट्स बनवल्या, मॉक टेस्ट दिल्या, बर्‍याच वेळा रिव्हिजन केली आणि इंटरनेटसारख्या रिसोर्सेसचा पुरेपूर वापर केला. ऋषिताने प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन त्या दृष्टीने तयारी केली.

UPSC चा अभ्यास करताना तिने बारीक सारीक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिले. मर्यादित पुस्तकांवर तिने अभ्यास केला. पण ती पुस्तकं वारंवार वाचली. संकल्पना नेहमीच स्पष्ट ठेवल्या आणि बेस मजबूत करण्यासाठी सगळ्यात आधी एनसीईआरटी पुस्तके वाचली. यातून तिने चांगली तयारी केली. ऋषिताने लिखाणाच्या अभ्यासावर खूप जोर दिला. तिने मुख्य परीक्षेच्या १५ दिवस आधी जवळजवळ दररोज परीक्षा दिल्या. ज्यामुळे तिचा वेग खूपच सुधारला. यासोबतच मॉक टेस्टचा देखील बराच फायदा झाला. ऋषिताने असंही सांगितलं की, निकालावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी केवळ तयारीवर लक्ष केंद्रीत करा. जर तयारी चांगली असेल तर निकाल देखील चांगला येणं स्वाभाविक आहे.