करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये सोमवारी झालेल्या (Railway Recruitment 2024) कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्ड खडबडून जागा झाला आहे. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी, रेल्वे बोर्डाने तब्बल 18,799 सहाय्यक लोको पायलटची तात्काळ भरती करण्याचे आदेश जारी केले आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे अतिरिक्त ड्युटी करणाऱ्या चालकांवरील ताण कमी होऊन मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
रेल्वे भरती बोर्डाचे आस्थापना संचालक विद्याधर शर्मा यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा लोको पायलट भरतीचा आदेश जारी केला आहे. १५ डिसेंबर २०२३ रोजी ५६९६ असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या भरतीसाठी यापूर्वीच मान्यता देण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु १६ विभागीय (Railway Recruitment 2024) रेल्वेमधून एएलपीची अतिरिक्त भरती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतल्यानंतर, रेल्वे बोर्डाने आता १८,७९९ सहायक लोको पायलटची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
31 टक्क्यांहून अधिक चालकांना 10 ते 12 सलग गाड्या चालवाव्या लागतात
आदेशात म्हटले आहे, की इंडियन रेल्वे रिक्रूटमेंट मॅनेजमेंट सिस्टम (OIRMS) रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, बंगलोरच्या मदतीने सहायक लोको पायलटची भरती प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे. रेल्वेत दीर्घकाळापासून चालकांची पदे रिक्त आहेत, याची नोंद घ्यावी. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाने गाड्या क्रमवार चलवण्यासाठी चालकांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. परंतु पुरेसे लोको पायलट नसल्याने ३१ टक्क्यांहून अधिक चालकांना १०-१२ सलग गाड्या चालवाव्या लागतात. यामध्ये आठ टक्के चालक १२ ते १६ तासांपेक्षा जास्त वेळ गाड्या चालवत आहेत.
लोको पायलट करतात अतिरिक्त काम (Railway Recruitment 2024)
२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डाच्या सेफ्टी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम (SIMS) नुसार, भारतीय रेल्वेमधील ६८.८ टक्के रेल्वे चालकांनी नऊ तास गाड्या चालवल्या आहेत. १७.२ टक्के चालकांनी ९ ते ११ तास, तर ६.२ टक्के चालकांनी ११ ते १२ तास आणि ८ टक्के चालकांनी १२ तासांपेक्षा जास्त सलग गाड्या चालवल्या. नियमानुसार, गाडी निर्धारित स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत चालकाला इंजिन सोडता येत नाही. त्यामुळे लांब पल्याच्या गाडीवर असणाऱ्या चालकाला १६ ते १८ तास किंवा त्याहून अधिक काळ सलग काम करावे लागते.
कामाच्या निर्धारित वेळेच्या अतिरिक्त काम केल्याने व सुट्टी न मिळाल्याने चालक थकवा आणि निद्रानाशाचे बळी ठरत आहेत. त्यांचा थकवा, निद्रानाश व मानसिक ताण वाढत असून त्यामुळे चालक एकाग्र होऊन रेल्वे चालवू शकत नाहीत. त्यामुळे देखील अपघात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com