करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तमाम शालेय विद्यार्थी (Online Attendance System) आणि शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी आदेश दिले आहेत. शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे.
कोणत्या तारखेपासून सुरु होणार ऑनलाईन नोंदणी
दि. 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंद केली जाणार आहे. स्विफ्ट चॅट या अॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी ‘अटेंडन्स बॉट’च्या वापराचे प्रशिक्षण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभाग, तालुका, केंद्रस्तरावरील शिक्षकांना देण्यात येणार असल्याचे निर्देश परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिले आहेत.
‘या’ अॅपचा होणार वापर (Online Attendance System)
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती त्या त्या वर्ग शिक्षकांनी ‘SwiftChat’ अॅप डाऊनलोड करून त्यामधील अटेंडन्स बॉटद्वारे ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेंडन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदविता येईल.
उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी शाळेचा यू-डायस क्रमांक आणि स्वतःच्या शालार्थ क्रमांकाचा वापर करायचा आहे. शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाईल क्रमांक शिक्षकांना वापरावा लागणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12, तर शाळांसाठी 10 ते 5 या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेंडन्स बॉटवर करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून (Online Attendance System) नोंदवावी, चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालेय क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालेय क्रमांक वापरून ऑनलाइन उपस्थिती नोंदवायची आहे. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना अडचणी येत असल्यास शालेय संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, यू-डायस या सर्व संकेतस्थळांतील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळांवरील अडचणी दूर होतील, असे शिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com