तुमच्या प्रमोशन ने ऑफिसमधील लोक जळत आहेत? मग त्यांना असे सांभाळा..

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

लव्हगुरु | ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं यश पचणी पडत नाही. तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं तर काहींच्या पोटात जोरात दुखायला लागतं. अशात तुमच्या जर हे लक्षात आलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतं. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता.

१) बॉसने एखाद्याचं कौतुक केल्यास काहींना याचा त्रास होतो आणि त्यामुळे ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. काहींच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडतं. यामुळे होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही स्वत: एक टीम म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करा. कामासंबंधी बोलणं करा. त्यांना तुमचा सकारात्मकपणा दाखवा. काही दिवसांनी परिस्थिती बदलेल.

२) जर आधीपासूनच काही लोक तुमच्यावर ‘जळतात’, तुमच्यावर राग धरून असतात तर अशावेळी परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला संयमाने काम करावं लागेल. आपल्या शब्दांवर कंट्रोल ठेवायला हवा. तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्या विरोधात त्यांच्यासाठी शस्त्र ठरू शकतो. याने ऑफीसमध्ये तुमची इमेज बिघडण्यास कुणीच रोखू शकणार नाही.

३) जर तुमच्या काही लोक ‘जळत’ असतील आणि यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अशांसोबत तुम्ही केवळ कामापुरतं बोला. पण जर तुमचा सिनिअरच तुमच्यावर ‘जळत’ असेल तर इथे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशावेळी काही गैरसमज असतील तर संवाद साधून ते दूर करावेत.

४) तुमचं जर बॉसने भरभरून कौतुक केलं किंवा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक बोनस दिला किंवा प्रमोशन दिलं तर ही गोष्ट ओरडत कुणाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला जरी याने आनंद झाला असला तरी तुमच्या या वागण्याला काही लोक गर्व समजू शकतात. यामुळे काही लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.

५) ऑफीसमध्ये जर तुमच्या सहकाऱ्याची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची एखादी कल्पना आवडली नाही तर तुमच्या डोक्यातील कल्पना त्यांच्यासमोर ठेवा. त्यांना काही सजेशन्स द्या. पण त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका.