करिअरनामा ऑनलाईन । “सरकारी अधिकारी होण्याचं (MPSC Success Story) आकर्षण मला लहानपणापासूनच स्वस्थ बसू देत नव्हतं म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. MPSC आयोगाच्या वेगवेगळ्या भरती परीक्षा दिल्या. हाती आलेलं यश थोडक्यासाठी हुकत होतं. वारंवार पदरी निराशा पडत होती. मागे झालेल्या चुकांमधून शिकत पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी तो दिवस उगवला आणि मी अधिकारी झालो.” ही कहाणी आहे समाधान घुटुकडे या तरुणाची. सर्व सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने उपजिल्हाधिकारी पदावर बाजी कशी मारली; हे आज आपण पाहणार आहोत. त्याची ही कहाणी निश्चितच मरगळलेल्या तरुणांना प्रेरणा देईल.
वडील माथाडी कामगार
समाधान घुटुकडे याचं बालपण महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील घेरडी या दुष्काळग्रस्त भागात गेलं. या भागात उदरनिर्वाहाच्या साधनांची कमतरता असल्याने समाधानचे आई–वडील आपल्या कुटुंबाला घेऊन नोकरीच्या शोधात मुंबईला गेले. त्यानंतर ते माथाडी कामगार म्हणून चेंबूर येथे काम करू लागले. त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या उत्पन्नातून ते घर चालवत होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते कष्ट घेत होते. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि कर्तुत्व गाजवावे अशी त्यांची अपेक्षा होती. मुलाने देखील वडिलांची अपेक्षा पूर्ण केली आणि जिद्दीने एमपीएससी (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवत थेट उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी लावली.
लहानपणापासून अधिकारी होण्याचं आकर्षण (MPSC Success Story)
समाधान याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मानखुर्द (मुंबई) येथे झाले. तर मोहिते पाटील विद्यालय येथे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. नंतर त्याने मेकॅनिकल हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने त्याला स्पर्धा परीक्षेचेही आकर्षण होते. त्याने पदवीच्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा व परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
….या कारणामुळे महसूल खात्यात अधिकारी व्हायचे होते
एकीकडे अभियांत्रिकीचा अभ्यास तर दुसरीकडे या अभ्यासातून वेळ मिळाला की MPSCचा अभ्यास असा दिनक्रम सुरु होता. हातात कोणतीही पदवी नव्हती, परंतू त्याने अनुभव घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. कारणही तसंच होतं. त्याने गावाकडची परिस्थिती (MPSC Success Story) जवळून बघितली होती. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयाशी त्याचा संबंध यायचा. त्यावेळी एकेक कागद काढण्यासाठी दिवस जायचा. छोट्या कामासाठी लोकांची होणारी तारांबळ दिसायची. सरकार दरबारी काम न झाल्याने हताश झालेले लोक पाहून, समाजातील या लोकांसाठी आपण काहीतरी करावे; अशी त्याची इच्छा होती. या कारणामुळे त्याला महसूल खात्यात अधिकारी व्हायचे होते.
संपूर्ण राज्यात पटकावला 11 वा क्रमांक
समाधानने जिद्दीने अभ्यास केला. अभ्यासाच्या जोरावर त्याने कर निरीक्षक, वनसेवा, राज्यसेवा अशा विविध परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांत अगदी थोडक्या गुणांनी त्याला अपयशास सामोरे जावे लागले. त्याने पहिल्या परिक्षेत झालेल्या चूकातून वाट काढत परीक्षेची तयारी केली. इतकेच नव्हे तर MPSC च्या परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून तो 11 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यास उपजिल्हाधिकारी पद मिळाले आहे. या पदावर काम करताना त्याला सर्वसामान्यांची सेवा करायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com