करिअरमंत्रा । व्हीन्स लोम्बार्डी (अमेरिकेचे माजी फुटबॉल कोच) यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, “जोपर्यंत तुम्ही पराभव पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकणार नाही.” हे तुमचे सांत्वन करण्यासाठी नाही बोलत आहे. कॅलिबर असणाऱ्या अनेकांना मी आज पर्यंत पाहिले आहे, जे अंतिम रेषा पार करू शकले नाहीत किंबहुना अधिकारी कधीच बनले नाहीत. त्यांचे बरोबरीचे जे अधिकारी बनले DC, DYSP, IAS, IPS झाले ते जास्तीचे हुशार आणि स्मार्ट होते असे मला कधीच वाटले नाही आणि पटले नाही. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे ही एक methodology / परीक्षापद्धती आहे, ज्याने ती समजून घेतली आणि राबवली तो यशस्वी झाला. ज्यांनी सूक्ष्मपणे समजावून न घेता केवळ राब राब राबले, ज्ञान मिळविले, हुशार झाले पण लौकिकार्थाने ते अयशस्वी झाले.
कालच्या निकालात थोडक्यात संधी हुकलेल्यानी हे मनावर ठासून बिंबवावे. 2019 च्या निकालाची चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे काही विद्यार्थ्यांना अगदी जहागीर असते त्याप्रमाणे किंवा हॅट्रिक असते त्याप्रमाणे 2017, 2018 आणि 2019 अशी सलग पोस्ट भेटली आहे. नो डाऊट त्यांचे यामध्ये डेडिकेशन तर आहेच मात्र याचा अर्थ असा होत नाही की, हे फक्त हुशार आहेत आणि लिस्टमध्ये स्थान न मिळालेले परंतु चांगली तयारी असणारे सर्व ‘ढ’ आहेत.
यशस्वी झालेत त्यांना या खेळाचे नियम पक्के समजले आहेत. योग्य त्या दिशेत त्यांचा सराव जास्त आहे. तात्पर्य, त्यांनी परीक्षा पद्धती कोळून प्यायली आहे असे म्हणण्याला नक्कीच वाव आहे.
यात जे यशस्वी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन. पण आता आपलं पाहू. येथे माझा भर ज्यांची तयारी चांगली आहे, मात्र ते सातत्याने अंतिम यादी पासून दूर राहत आहेत त्यांचेवर आहे. त्यांना मी म्हणतो ती मेथड ही समजली आहे, परंतु त्यांचे ग्राउंड वर्क कमी पडत आहे. याला कारणीभूत कोणत्या बाबी आहेत त्या थोडक्यात तपासू.
१) गेल्या ३/४ वर्षातील भूतकाळातील अपयशाचं ओझं यांच्या सतत मानगुटीवर असते त्यातून स्वतःला अंतर्मनात दूषणे देणे तसेच पराभवाची मानसिकता जोपासणे.
२) आपल्या बरोबरीचे DC, DYSP, IAS, IPS आपण मात्र अजून शून्यावर हा मनात विचार आणि त्यातून येणारे गिल्ट सतत चघळत बसणे.
३) सातत्याने अपयशी ठरल्याने घरचे / बाहेरचे यांची दूषणं , टोमणे यांना सामोरे जावे लागणे त्यातून स्वतःच्या भाव भावना, मनस्थिती दुसऱ्याकडे सोपविणे.
४) अभ्यास प्रक्रियेत काही बाबतीत स्वतःला गृहीत धरणे, आयोगालाही हलक्यात घेणे. “मी हे करेन आणि इझी आहे” हा भ्रम बाळगणे.
५) अभ्यासक्रमातील सर्व घटकांना समान न्याय न देता सापत्न वागणूक देणे. यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी गोत्यात येणे.
६) मूड स्वीन्ग्ज ना सामोरे जावे लागणे, मनस्थिती अस्थिर राहणे त्यातच अभ्यासक्रम रेटण्याचा प्रयत्न करणे.
७) स्वतःच्या डेली रुटीनवर बिलकुल ताबा नसणे, गोष्टी ठरवून, योजून करण्यापेक्षा “होईल त्याप्रमाणे” या धोरणाला बळी पडणे.
८) ज्या परिस्थितीमध्ये आपण एक्झाम साठी आपले शंभर टक्के देऊ शकत नाही त्याच परिस्थितीमध्ये पुढे आउट पुट काढणे चालू ठेवणे.
९) स्वतःचे, अभ्यास पद्धतीचे, एक्झाम चे ज्याला सूक्ष्म विश्लेषण म्हणतो ते कधी केलेलेच नसते फक्त अभ्यासच करत राहणे.
१०) ज्याला “रुथलेस डेडिकेशन” म्हणतात ( आपल्या ध्येयाप्रती निष्ठुरपणे श्रद्धा बाळगणे व त्याप्रमाणे प्रत्येक पाऊल टाकणे.) ही अवस्था त्यांच्या आयुष्यात कधीच येत नाही. काही ना काही मध्ये येतच असते, ते सांभाळत हे लोक तयारी करत असतात.
या झाल्या त्रुटी, कमतरता, चुका. पण काय करायला हवं? किंवा यावर सोल्युशन काय असू शकते? ते पाहू.
१) आपल्या चुकांवर सूक्ष्म पद्धतीने काम. आयोगाचा एक एक M.C.Q. व त्याचे पर्याय अगदी डिसेक्शन केल्याप्रमाणे हाताळणे.
२) कन साईज / स्लीम केलेल्या मटेरियल ची / मायक्रो नोट्स ची वारंवार रिविजन करणे.
३) आयोगाच्या मागील झालेल्या पेपरमधील जुन्या प्रश्नांचा सातत्याने सराव करणे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे या सरावातून मिळणाऱ्या कच्चा दुव्यांवर मजबूत काम करणे. एक चूक पुन्हा नाही.
४) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जवळपास 70 टक्के सिल्याबस वर पूर्ण ताबा घेणे. एखाद्या sub topic चे नाव उच्चारले तरी आयोगाने मागे विचारलेले प्रश्न सांगता येणे असा कब्जा घेता यायला हवा आणि हो हे शक्य आहे.
५) अभ्यासक्रमाचा एक ही टॉपिक किंवा सब टॉपिक दुर्लक्षित न करणे. भाषेचे दोन्ही पेपर्स वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि लेखन कौशल्य याची कसून तयारी आवश्यक. सामान्य अध्ययन प्रमाणेच.
६) छोटे छोटे प्लॅन तयार करणे, अंमलबजावणी करणे. दीर्घ नियोजना पेक्षा कमी कालावधीचे नियोजन व त्याची कडक अंमलबजावणी आवश्यक. रोजची क्षणाक्षणाची मेहनतच कामी येईल. तुम्ही भूतकाळात काय करत होता / किती महान होता याला काही किंमत नाही.
७) जेव्हा जेव्हा लो फिलिंगचा त्रास होईल तेव्हा तेव्हा स्वतःशी संवाद, मेडिटेशन करणे. रोज नियमितपणे किमान पंधरा मिनिट ते तीस मिनिट व्यायाम तुमच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग असला पाहिजे. भरपूर पाणी पिणे. ( या सूचना साध्या वाटू शकतात पण या माझ्या मते गेम चेंजर ठरतात. ज्यांना चूक लक्षात येत नाही त्यांनी यावर काम करावे. )
८) स्वतःला एका रूटीनमध्ये मोल्ड करणे. एक दिवसाचे शेड्युल व त्यातील अभ्यास एक सवयच बनून गेली पाहिजे. मिशन मोड मध्ये काम झाले पाहिजे.
९) हा प्रवास दीर्घ पल्ल्याचा असतो, त्यामुळे एकट्याने किल्ला लढविण्याचा प्रयत्न न करता आपल्याच कुवतीच्या संख्येने कमी असलेल्या मुलांचा एक डेडिकेटेड ग्रुप बनविणे. त्या ग्रुपमधील ऍक्टिव्हिटीज साठी ठरावीक वेळ देणे याचा दीर्घकालीन टेम्पो राखण्यासाठी व चाकोरीत राहण्यासाठी निश्चितच फायदा झाल्याचे दिसून येते.
१०) 2020 साठी उरलेला जून आणि जुलै महिना कसा वापरता अत्यंत महत्त्वाचे. मेन्स चे टाईम टेबल अनिश्चित. तेव्हा पूर्वपरीक्षा – मुख्य परीक्षा यांचे संतुलन आणि मनस्थिती या सर्वांचा ताळमेळ निर्णायक ठरेल. यासाठी आपली तयारी दसनंबरी असली पाहिजे. ही तयारी परीक्षेसाठी आहेच मात्र ही रोजच्या सवयीचाच भाग बनली पाहिजे.
माझ्या मते वरील गोष्टींचे पालन केले तर मात्र यशापासून कोणीच रोखू शकणार नाही. ही अतिशयोक्ती नसून ग्राऊण्ड वरती राबविलेल्या बाबी आहेत. यातून रिझल्ट निश्चित आहे. क्षणाक्षणाला स्वतःकडून आउट पुट काढून घेणे हे या पद्धतीचे सार आहे ते आत्मसात होणे म्हणजेच यशाकडे वाटचाल करणे होय. शेवटी जाता जाता तत्वज्ञ व्हाईस रॉ यांचे विधान येथे समयोचित वाटते. ते म्हणतात,
“आजचं यश आणि आजचे अपयश म्हणजे आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासातले केवळ एक पाऊल आहे. अपयश कधी अंतिम नसतं व यश शाश्वत नसतं. आयुष्य हा एक खेळ आहे. तुम्ही जर पुरेसा वेळ खेळत राहिलात तर तुम्ही जिंकाल. मध्येच सोडून देऊ नका. शेवटपर्यंत पुरेशा अवधी पर्यंत खेळा. बघता बघता तुम्ही फिनिशिंग लाइन ओलांडून जाल.”
हे सदैव ध्यानात ठेवा. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी सर्वाना शुभेच्छा.
धन्यवाद.
_________________________________
मिथुन पवार
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पुणे
82759 33320
टेलिग्राम चॅनेल :- @mithunpawar