स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे.  सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे.

या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. तेव्हा अनेक क्लासचालक पूर्ण कोर्सची रक्कम ही आगाऊ घेतात. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी या सर्व घटकांना पुढील आवाहन केले आहे.

रोहित पवार म्हणतात, “स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी अनेक विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांचं शुल्क आगावू भरलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लासचे जवळपास दोन महिने वाया गेल्यामुळे क्लास चालकांनी एकतर तेवढं शुल्क कमी करावं किंवा क्लासचा कालावधी दोन महिने पुढे वाढवावा, ही विनंती.”

रोहित पवार यांच्या भूमिकेमुळे स्पर्धा परीक्षार्थी यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अनेक प्रश्न हे स्पर्धा परीक्षार्थी यांच्या पुढे उभे आहेत. अनेक परीक्षार्थी रूम सोडून आपआपल्या गावी परतले आहेत, परंतु त्यांचं रूम/फ्लॅट इत्यादी भाडे मात्र सुरू राहील अशी चिंता त्यांना आहे. घरमालकांनी सुद्धा ह्या संकटात काहीशी सूट दिल्यास स्पर्धा परीक्षार्थी यांना नक्कीच दिलासा मिळेल. अशी मागणी अनेक परीक्षार्थी करीत आहेत.