करिअरनामा ऑनलाईन । व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) किंवा केंद्रीय प्रवेश परीक्षाच (कॅट, सीमॅट) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचा सरकारचा निर्णय लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या सूचनांनंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येतील, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
गतवर्षीपर्यंत खासगी संस्था, संस्थांच्या संघटना यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या अॅटमा, सॅट, मॅट यांसारख्या अनेक परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु गतवर्षी सुमारे ४० विद्यार्थ्यांनी खासगी संस्थांच्या परीक्षांची खोटी गुणपत्रके जोडून नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेतल्याचे उघड झाले होते. त्यामुळे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी, कॅट, सीमॅट या परीक्षांचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, हा निर्णय सीईटी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची संधी गेली. सरकारच्या या निर्णयाला अॅटमा ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांने न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी तीनच प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्याच्या आदेशाची पुढील वर्षीपासून अंमलबजावणी करण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानुसार सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबविली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेच्या सीईटी निकालानंतर सीईटी सेलने इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. फार्मसी आणि इंजिनिअरिंगचे अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी केले आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com