JEE Main 2021: NTA ने घेतलं परीक्षेच्या तारखांचं परिपत्रक अचानक मागे; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली । देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE Main परीक्षांबाबत गोंधळ पाहायला मिळत आहे. JEE Main 2021 परीक्षेच्या तारखांची घोषणा मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केली. मात्र, सायंकाळी उशिरा हे परिपत्रक एनटीएने मागे घेतलं. १५ डिसेंबरपासून या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती, त्यासंबंधीचं परिपत्रकही मागे घेण्यात आलं आहे.

शिक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की अद्याप JEE Main परीक्षेच्या तारखेसंबंथी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत शिक्षण मंत्रालयाचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत JEE Mainच्या तारखा निश्चित सांगता येणार नाहीत. मात्र, JEE Main परीक्षेच्या तारखांचं हे परिपत्रक तूर्त मागे घेण्यात आलं असलं तरी त्यातली माहिती थोड्याफार फरकानं सारखीच राहिल असं म्हटलं जात आहे. जेईई मेन एकाहून अधिक सत्रांमध्ये आयोजित करण्यात येईल, हे त्या परिपत्रकातून स्पष्ट झालं होतं.

याशिवाय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनीही अलीकडेच एका वेबिनारमधून JEE Main दोनपेक्षा अधिक सत्रात घेण्याचा सरकारचा मानस बोलून दाखवला होता. विविध राज्यांच्या बारावी बोर्ड परीक्षांच्या आयोजनाबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे त्या परीक्षा JEE Mainशी क्लॅश होऊ नयेत यासाठी JEE ची सत्रे वाढवली जाण्याची शक्यता आहे.

पॅटर्नमध्येही बदल?
मंगळवारी जारी करून नंतर मागे घेतलेल्या परिपत्रकातून JEE Main परीक्षेच्या पॅटर्नमधील बदलही पुढे आला होता. त्यानुसार, प्रत्येक विषयात यंदा ३० ऐवजी २५ प्रश्न असणार असल्याची माहिती मिळत होती. JEE Main 2021 परीक्षेच्या तारखा कदाचित नव्याने जाहीर केल्या जातील, मात्र अन्य माहिती जैसे थे राहण्याची शक्यता आहे.