MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी ?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन बऱ्हाटे
महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाने 2020 मध्ये होणाऱ्या  परीक्षांचे वेळापत्रक अजुन जाहीर केले नाही, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ते जाहीर होईल, तोपर्यंत परीक्षार्थींच्या मनात राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या वर्षी  प्रमाणे 17 फेब्रुवारी दरम्यान होईल की पारंपरिक पद्धतीने एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात होईल याबाबत संभ्रम राहणे साहजिक आहे, तरीही  2020 ची राज्यसेवा पूर्व फेब्रुवारी रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल असेच गृहित धरून आता पुर्वची तयारी करावी ज्यांचा परीक्षार्थींना फायदाच होईल. एप्रिल महीना गृहीत धरणे तयारी साठी आव्हानाचे आणि उशीराचे ठरेल. फेब्रुवारी मध्ये पुर्व ग्राह्य धरली तर पुर्व सामान्य अध्ययन पेपर 1ची  तयारी कशी करावी हे सदर लेखात सामान्य अध्ययन 1 च्या अभ्यासक्रमानुरूप पाहु.
MPSC पुर्व परिक्षेला ‌सामान्य अध्ययन 1 (GS1) मध्ये इतिहास, राज्यव्यवस्था,अर्थव्यवस्था,भुगोल, पर्यावरण,सामान्य विज्ञान , चालु घडामोडी या विषयावर 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न(प्रत्येकी 2 गुण) 200 गुणांना असतात तर सामान्य अध्ययन 2(GS2- CSAT) मध्ये आकलनासाठी उतारे, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि निर्णयक्षमता तपासणारे एकुण 80 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न(प्रत्येकी 2.5 गुण) विचारले जातात. सद्यस्थिती नुसार  राज्यसेवा पूर्व मध्ये दुसरा पेपर क्वालिफाईंग करण्याचा प्रस्ताव न स्विकारल्याने GS1 व GS2 असे दोन्ही परीक्षांचे गुण पुर्वच्या कट ऑफ साठी मोजले जातील .
सर्वप्रथम 2013 पासुन 2019 पर्यंतचे पुर्व परिक्षेचे सामान्य अध्ययन पेपर 1 आणि 2 चे बारकाईने विश्लेषण करावे, आयोगाने कोणत्या घटकावर प्रश्र्न विचारलेत? किती विचारले आहेत?‌कोणत्या उप घटकांवर भर आहे हे परिक्षार्थीने समजुन घेणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास पुढील अभ्यासासाठी दिशादर्शक ठरतो.
परिक्षार्थींनी अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकांवर राज्य शासनाची क्रमिक पुस्तके आणि ठराविक NCERTS मधुन मुळ संकल्पना स्पष्ट करुन घेतल्यानंतर स्वत:च्या आकलनानुसार आपापले अभ्यास संदर्भ साहित्य ठरवुन घ्यावे , त्याला आधार म्हणुन आपण सामान्य अध्ययन पेपर 1 च्या अभ्यासक्रमातील घटक समजुन घेऊ.
1. राष्ट्रीय (महाराष्ट्र सहित) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालु घडामोडी –
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे , हा घटक मार्क्स मिळवुन देणारा आहे यामध्ये राजकीय, शासकीय विधेयके , महत्त्वाची धोरणे आर्थिक, सामाजिक घडामोडी, योजना, महतत्वाचे पुरस्कार, साहित्य, व्यक्ति, पर्यावरण,‌ क्रिडा,  संरक्षण, जागतिक परीषदा, आणि तंत्रज्ञान इत्यादींवर प्रश्र्न विचारले जातात, नियमित वर्तमानपत्र वाचुन नोट्स काढणारा आणि शेवटी स्पर्धापरिक्षा मासिकातुन उजळणी करणार्यांना सगळे प्रश्र्न सोडविणे सोपे होते.
साधारण एक वर्ष पुर्वीपासून म्हणजे जानेवारी 2019 पासुन 2020 च्या राज्यसेवा पूर्व पर्यंत चालु घडामोडी चे घटक पक्के करायला पाहिजेत. 2019 च्या पुर्व परीक्षेला जागतिक घडामोडी संबंधित आणि इतर काही आव्हानात्मक प्रश्र्न विचारले होते. चालु घडामोडी आतापासून गांभीर्याने घेऊन तयारी केली पाहिजे.
2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) , भारतीय राष्ट्रीय चळवळ –
या घटकांमध्ये अनुक्रमे स्वातंत्र्याचा इतिहास, प्राचीन भारत, महाराष्ट्राचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास इत्यादी उपघटकांच्या प्राधान्यक्रमानुसार तयारी करावी तसेच  आयोग गांधी,स्वातंत्रञलढा , कांग्रेस यापलीकडचे सुक्ष्म आणि कोपर्यातील  व्यक्ती, साहित्य, घटना किंवा संघटना यावर प्रश्र्न विचारत आहे ,या घटकाच्या अभ्यासावर सगळ्यांचीच पकड बसत नाही, मात्र  इतिहासाचे संदर्भ ग्रंथातुन बारकाईने तयार केलेले त्यावर तथ्य आणि संकल्पनात्मक जोडणीचा घटनाक्रम लावुन  इतिहास समजुन घेणाराच इतिहासावरील  प्रश्र्न सोडवु शकतो . इतिहासातील काही अनपेक्षित प्रश्र्नांसाठी परिक्षार्थीनीं कायम तयार राहावे उपलब्ध इतिहासज्ञानाआधारेच बरोबर उत्तरापर्यंतच पोहचण्याच कसब विकसित केले तरच इतिहास घडेल. इतिहासाची तयारी वेळखाऊ आहे परंतु तेवढा गुण देणारी नाही. राज्य शासनाची जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके, बिपिन चंद्रा, राजीव आहीर, ग्रोव्हर(किंवा इतर अभ्यास साहीत्य ) इत्यादी संदर्भ ग्रंथामधुन तयारी पुर्ण होते.
3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भुगोल –
नकाशाच्या आधारे तसेच फॅक्ट्स पक्क्या असणार्या आणि  6 वी ते 12 वी  क्रमिक , NCERTs च्या आधारे मुळ संकल्पना स्पष्ट करणार्या परिक्षार्थी साठी कमी वेळात जास्त मार्क्स देणारा घटक आहे,  प्रश्र्न वन लाईनर, जोड्या जुळवा, स्थळ, नकाशाच्या आधारे उत्तर शोधणे इत्यादी प्रकारातील असतात. महाराष्ट्रासाठी खतीब भारताच्या भुगोलासाठी NCERT‌ ची पुस्तके , सवदी , माजिद हुसेन इत्यादींचे संदर्भ ग्रंथ उपयोगी पडतात. भुगोलाचा अभ्यास अनुक्रमे प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक या प्राधान्यक्रमाने करणे इष्ट राहील.
4. महाराष्ट्र आणि भारत – राज्यव्यवस्था, संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासनव्यवस्था, सार्वजनिक धोरणे, हक्क संदर्भातील मुद्दे इत्यादी. –
राज्यव्यवस्था आणि राजकिय व्यवस्थेचा अभ्यास तुलनात्मक करावा उदा. पंतप्रधान-मुख्यमंत्री, राज्य-केंद्र इ.  तसेच घटनानिर्मिती, कलमे,  महानगरातील मंडळे ,रचना ,आयोग, स्थानिक प्रशासन आणि पंचायत संबंधित सर्व उपघटक तयार करुन ठेवावेत राज्यशास्त्रा वर अवलंबुन राहुन मार्क्स मिळविण्याचे दिवस आता गेले आहेत, सगळ्यांचा हाच विषय आवडता आणि समजणारा असतो पण हा विषय आता चतुरस्त्र अंगाने समजुन घेण्याचे दिवस आलेत . एम.लक्ष्मिकांत यांचे इंडियन पाॅलिटी आणि पी.एम. बक्क्षी यांचे भारताचे ‌संविधान(कलमे फक्त) हे दोन संदर्भ ग्रंथ पुरेसे आहेत.
5. आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशकता, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक सेवा धोरण इत्यादी-
राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा घटक , हा विषय चालु घडामोडी, शासकीय योजना, धोरणे आणि अर्थव्यवस्थेच्या मूळ संकल्पना यांच्या जोडणीत करावा. संकल्पना स्पष्ट असणार्याना हा विषय पैकीच्या पैकी मार्क्स मिळवुन देऊ शकतो .अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी(महाराष्ट्र व भारत) यातुन प्रश्र्न येण्याची स्विकार्यता परिक्षार्थ्यांनी कायम ठेवावी. कमी वेळेत जास्त आवाक्यात येणारा हा विषय आहे रंजन कोळंबे, किरण देसले किंवा रमेश सिंग या संदर्भ ग्रंथामधुन तयारी पुर्ण होईल.
6.पर्यावरणविषयक सामान्य मुद्दे – परिस्थितीकी, जैवविविधता आणि हवामान बदल(घटकांच्या विशेष अभ्यासाशिवाय) – 
भविष्याचा वेध घेणारा आणि जगण्याचा शाश्वत विकास समजुन घेण्याचा विषय, कालानुरूप अधिक महत्त्व प्राप्त झालेला विषय परिक्षार्थींनी समजुन घेणे आवश्यक आहे. पर्यावरणासंबधी मुळ संकल्पना, परिस्थितीकी, जैवविविधता, हवामान बदल, आंतरराष्ट्रीय करार , संस्था, उपक्रम, धोरणे इत्यादी चालु घडामोडी संबंधित सर्व मुद्दे बारकाईने समजुन घेतले पाहिजेत. शंकर IAS प्रकाशित ‘पर्यावरण’ या संदर्भ ग्रंथामधुन वरील सर्व उपघटकांची तयारी पक्की होते.
7. सामान्य विज्ञान – 
सगळ्यांना धसका घ्यायला लावतील असे काही प्रश्र्न विज्ञानामध्ये विचारयाला आयोगाने  सुरुवात केली आहे ,  परंतु सर्व संकल्पना स्पष्ट असतील तर निदान निम्म्याहुन अधिक प्रश्र्न तरी सोडवता यायला हवेत
विज्ञानाचे प्रश्न चुकण्याची दोन कारणे असु शकतात.
1. अतांत्रिक विषयातील पदवीधर विज्ञाना कडे शत्रु सारखे बघतात,त्यांना विज्ञानाचा तिटकारा असतो
2. तांत्रिक पाश्र्वभूमी असलेले पदवीधर विज्ञानाला ग्राह्य धरतात
विज्ञानावरील प्रश्र्न विचारण्याची  एक विशिष्ट पद्धत आहे ती समजुन घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे
उदा. संशोधन, वर्गीकरण, प्रकाश, रासायनिक सुत्रे/अभिक्रिया, रोग, शरीररचनेतील घटक, वनस्पती, जीवशास्त्र, इत्यादी.
ठराविक प्ररकारचीच गणितं विचारली जातात उदा. विद्युत धारा, प्रकाश इ. विज्ञानावरील प्रश्नांचा बाऊ न करता  ठराविक घटक पक्के करणे आवश्यक आहे,विज्ञानाचे प्रश्न आॅप्शनला टाकणे धोक्याचे ठरु शकते.  6 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके आणि NCERTs मधुन विज्ञानाची कोणत्याही विशेष संदर्भ ग्रंथाशिवाय तयारी पुर्ण होते. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान पुर्व पास होण्यासाठी असामान्य भुमिका पार पाडते त्यामूळे विशेष वेळ देऊन तयारी करुन घ्यावी.
वरील अभ्यासानुरूप प्रत्येक विषयाचे बेसिक संकल्पना आणि विश्लेषणात्मक संकल्पना अनुक्रमे क्रमिक पुस्तके (6-12वी) आणि संबंधित संदर्भ ग्रंथामधुन तयारी करणे अपेक्षित आहे, पुर्व पास होण्यासाठी CSAT मधील गुण आवश्यक असले तरी सामान्य अध्ययन 1 मध्ये सरासरी पेक्षा अधिक गुण मिळविणे अनिवार्य आहे कारण सामान्य अध्ययन 1 ची तयारी दुधारी हत्यारासारखी उपयोगी पडते, ज्याचा फायदा मुख्य परिक्षा आणि मुलाखतीसाठीही होतो
सामान्य अध्ययन 1 च्या‌ विस्तृत तयारी सोबत जास्तीतजास्त उजळणी आणि अधिकाधिक प्रश्नपत्रिका सराव आवश्यक आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचा अंदाज घेण्यासाठी एम.पी.एस.सी.च्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि यु.पी.एस.सीच्या 2018 आणि 2019 चे पुर्व परिक्षेच्या प्रश्नपत्रिका (आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांऐवजी विज्ञानावर भर) अभ्यासल्यास अजुन स्पष्टोक्ती येऊ शकते.
पुर्व पास होणार्यांकडे अधिक वेळ किंवा विशेष पुस्तके नसणार आहेत, ते पास होतील केवळ त्याच्या “वेळेच्या सुयोग्य” वापरामुळे आणि “अभ्यासाच्या विशेष पद्धती” मुळे .
“जो लढ़ सका हैं , वही तो महान हैं !!”
आपले सभोवताल महापरीक्षा गदारोळ, वाढती बेरोजगारी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक इत्यादी गोष्टींमध्ये दंग असले तरी आपण 2020 ची पुर्व चांगल्या गुणांनी (250+) उत्तीर्ण होण्याचा चंग बांधला पाहिजे. 
#बाकी_आपण_सुज्ञ_आहात…..


nitin barhate
नितिन बऱ्हाटे.
9867637685
(लेखक “लोकनीति IAS, मुंबई” चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)
Next article – 

2020 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??