करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यात राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यामध्ये रोज ५० टक्के कर्मचारी येतील असं नियोजन केलं आहे. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी व दुपारी सुरु होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाइन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असे सरकारने सांगितले आहे.
जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असा दिलासा मुख्यमंत्र्यानी नागरिकांना दिला आहे.