परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील क्रीडासंकुलाच्या मैदानावर ४ जानेवारी पासून सैन्य भरती मेळावा सुरु आहे.त्याची माहीती देण्यासाठी मेजर जनरल विजय पिंगळे आणि कर्नल तरुण जमवाल यांनी गुरुवारी दि. ९ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल अनुराग, कर्नल राजीवकुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.एस पाटील आदी उपस्थित होते.
औरंगाबाद, बुलढाणा, जालना, जळगाव, नंदुरबार, हिंगोली,परभणी, धुळे, नांदेड या नऊ जिल्ह्यासाठी सध्या भरती सुरु असुन १३ जानेवारी पर्यंत ती चालणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने नऊ जिल्ह्यातून तब्बल ६८ हजार अर्ज आले होते.त्यापैकी ३५ हजार उमेदवारांची नोंदणी झाली होती.त्यातील २८ हजार ५०० उमेदवारांची नऊ तारखेपर्यंत मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे.मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जात असून त्यात जे उत्तीर्ण होणाऱ्या सर्वांची २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील लष्कराच्या केंद्रावर लेखी परिक्षा घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
सैन्य भरतीसाठी दिवसा ऐवजी रात्रीची निवड
दिवसांऐवजी परभणी येथील सैन्यभरती रात्री काच केल्या जात आहे याविषयी चर्चा होते परंतु यावेळी दिवसा वातावरणात बदल होतो.रात्रीच्यावेळी वातावरण स्थिर राहते.तसेच थंडीत कितीजण यशस्वी होतात ते पाहणे महत्वाचे असल्याने रात्रीची वेळ निवडण्यात आल्याचे तरुण जमवाल यांनी सांगीतले.याशिवाय विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी यांना भरतीमुळे त्रास होऊ नये ,हे देखील रात्रीच्या वेळी सैन्य भरती घेण्यामागचे कारण असल्याचे यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले.