स्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…!! पार्श्वभूमी :- सुशांतसिंगने काल केलेलं कृत्य.. डॉ.कमलेश जऱ्हाड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मी डॉक्टर झाल्यानंतर मित्राशी विचारविनिमय करून स्पर्धा परीक्षेची UPSC-MPSC ची तयारी सुरू केली..! तयारी करत असताना अनेकदा अपयश आलं.. कधी इंटरव्ह्यू कॉल चार मार्कांनी रहायचा तर कधी फायनल पोस्ट काही मार्कांनी मिळायची राहिली..!
                   या सगळ्यात गाठलेली उंची म्हणजे घरातील तिघेही बहीण-भाऊ परीक्षेची तयारी करत असल्यामुळे तिघांच्या अपयशाचं टेंशन सतत मनात असायचं… यात आई वडिलांचा शेवटपर्यंत सपोर्ट होता ही मोठी जमेची बाजू..!
           
             स्पर्धा परिक्षेनी सर्व काही पाहायला लावलं , शिकवलं.. चांगले-वाईट सगळे दिवस दाखवले.. जवळच्या मित्रांची निवड व्हायची तेव्हा त्यांच्या यशाचा आनंद खूप व्हायचा  पण आपण ह्या लिस्ट मध्ये का नाही याचं दुःखही तेवढंचं असायचं…
            या सर्व काळात माझ्या मनात एकदा-दोनदा तरी नैराश्याची भावना , टोकाचे नकारात्मक विचार येऊन गेले.. पण मुळातच मनाने अतिशय स्ट्रॉंग असल्याने आणि इच्छाशक्ती  प्रचंड असल्याने त्या विचारांना आयुष्यात मी जास्त थारा कधीचं दिला नाही..!
             पण जेव्हा जेव्हा तसा विचार मनात आला माझ्या हक्काची माणसं कायम माझ्या बरोबर असायची.. डॉ.मनोजकुमार चौधरी सर(उपप्राचार्य अष्टांग आयुर्वेद कॉलेज , पुणे) , रोहित जोशी (IRS) , डॉ.विवेक भस्मे(IAS) , स्वप्नील पवार(ED) , कौशल वाघ(PSI) , वैभव फालक , स्वप्नील राणे , राहुल पाटील , विक्रम पवार , डॉ. श्रीकांत जगताप इ..
       जेव्हा कधी फार टेन्शन यायचं तेव्हा मी रोहितला कॉल करायचो.. पोस्ट मिळायच्या आधी म्हणजे साधारण नोव्हेंबर-२०१८ च्या आधी रोहितचं आणि माझं बोलणं असं असायचं. मी- रोहित माझं काही झालं नाही तर तुला मला Settle करून द्यावं लागेल , Plan B मनात होताचं तो कोचिंग संस्थेचा , तुला Guest Lecturer म्हणून यावं लागेल , तुझ्या नावाचा-Post चा उपयोग करून घेईन वगैरे वगैरे बोलायचो.. बिचारा सगळं ऐकून घ्यायचा त्यावर रोहीत म्हणायचा, कमलेश मी इथेच आहे , कोणी कुठेचं जात नाहीये , सगळा सपोर्ट करेल पण हे विचार मनातून काढून टाकून तयारी कर.. कमीत कमी 2-3 तास बोलणं व्हायचं.. बोलून झाल्यानंतर पुन्हा एकदा मूड ठीक होऊन जायचा आणि फुल्ल ऑफ पोसिटीव्हीटी ने परत अभ्यास सुरू…
               घरातल्या छोट्या छोट्या इशू पासून ते UPSC-MPSC तलं अपयश , सगळं काही शेयर करायचो आणि आजही करतो आहे… मिलिटरी बॉयस् हॉस्टेल (MBH) पासूनची मैत्री असल्यामुळे त्याचा माझ्यावर इतर कोणापेक्षाही जास्तच विश्वास.. येणाऱ्या अपयशात देखील रोहित ने कधीचं साथ सोडली नाही , किंबहुना रो.जो. ला परिस्थिती सर्वात चांगली माहिती होती… पहिल्या पगारातून माझ्यासाठी आर्थिक मदत करण्यापासून ते थेट UPSC MAINS-2015 च्या १० दिवस आधी मला ऐकून घेतलं.. ! अजून मित्राकडून कोणती अपेक्षा ठेवावी..??

खरं तर माणसाच्या मनात कोणतेही विचार येऊ शकतात , ते आले तरी त्यात चुकीचं असं काहीचं नसतं.. उलट ते आपल्या नॉर्मल असण्याचं द्योतकचं असतं, फक्त ते विचार आपल्यावर हावी होता कामा नये, याची खबरदारी आपल्याला घेता यायला हवी आणि त्यापासून परावृत्त करणारे मित्र आयुष्यात आपण कमावलेले असावेत, त्यासाठी आपला स्वभाव आणि इतरांशी वागणं हे देखील तितकंच महत्वाचं…!

        कधीही हार न मानण्याची वृत्ती असल्यामुळे आत्महत्या तर मी कधीच केली नसती वा अन्य टोकाची भूमिका घेतलीच नसती (UPSC-MPSC ने Post तर दिलीचं पण त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे जगणं शिकवलंय , घडवलंय..! ) पण नैराश्याचा विचार पण जेव्हा कधी माझ्या मनात आला, त्यापासून परावृत्त करणारे काही मित्र माझ्याजवळ कायम होते , याचा मला खरंच खूपचं अभिमान वाटतो…
            मला सुशांतसिंग होण्यापासून वाचवलं ( इतकं टोकाचं पाऊल तर मी कधीच उचललं नसतं ) त्याबद्दल मी खरच माझ्या मित्रांचा व त्यात रोहित जोशी याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच मी २०१८-२०१९ चं यश पाहू शकलो..
            अजूनही बराच लांबचा पल्ला आपल्याला गाठायचाय… (२०१९ च्या Attempt ला DC व्हायचा Chance नाहीये त्यामुळे एक शेवटचा Try म्हणून LockDown चा पुरेपूर फायदा मी करून घेतलाय.. (७०-७५% तरी) )

आपल्यातला प्रत्येक जण जीवनात संघर्ष करत असतो , संकटांना सामोरं जात असतोचं , भले तो कोणत्याही पदावर का असेना..! आयुष्यात आनंदाने आणि समाधानाने जगता येणं महत्त्वाचं..!

पैसा , नाव सगळं होईलचं , पण ते सगळं असल्यानंतर सुद्धा आनंदात सकारात्मक विचाराने जगता यायला हवं.. प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगता यायला हवा.. आपण जे आयुष्य जगतो आहोत तसं आयुष्य जगायला मिळावं म्हणून लाखो लोकं देवाकडे प्रार्थना करत असतात , हे सत्य आपल्याला माहिती असायला हवं..
           आपल्यावर कितीही वाईट प्रसंग येऊ देत , आत्महत्या हा पर्याय असूचं शकत नाही..! आलेल्या संकटांना निधड्या छातीने सामोरं जाता आलं पाहिजे , त्याच्याशी दोन हात करता यायला पाहिजेत , तरचं जगण्याचा खरा अर्थ समजला , असं मला तरी वाटतं..!
               मधल्या काळात अडचणीत असणाऱ्या माझ्या अनेक मित्रांना मी थोडीफार मदत , त्यांना Motivate-Inspire करू शकलो याचाही आनंद मला आहेच आणि यापुढेही कोणालाही काहीही मदत लागली तरी शक्य तितकी मदत करायची माझी कायमचं तयारी राहील..!
          
शेवटी मी कोणालाही एवढंच म्हणेल की,       

” IF SUICIDE EVER CROSSES YOUR MIND , JUST KNOW I WOULD RATHER LISTEN TO YOUR STORY THAN ATTEND YOUR FUNERAL..”

” #मिलता_बहुत_कुछ_है_जिंदगी_में ,
#बस_हम_पर्वा_उसकी_करते_है_जो_हासील_ना_हो_सका..!”..

– डॉ.कमलेश वि. जऱ्हाड. (स.कक्ष अधिकारी , मंत्रालय , मुंबई )

Twitter – Dr.kamlesh