करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (CA Foundation Result 2023) अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचा म्हणजेच ‘ICAI’ च्या सीए (CA) फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते, अखेर हा निकाल हाती आला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे. यंदा केवळ २४.९८ % परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हा निकाल सोमवारी दि. ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. सीए फाऊंडेशन अभ्यासक्रमाची परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेत एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सीए अभ्यासक्रमाचे तीन टप्पे असतात. त्यातील फाऊंडेशन हा पहिला टप्पा आहे. त्यामुळे हा टप्पा पूर्ण झाला तर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. त्यामुळे काल निकाल जाहीर झाल्यापासून या निकालाचीच चर्चा आहे.
अशी आहे निकालाची आकडेवारी
यंदाच्या जून २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी एकूण १,०३,५१७ विद्यार्थी बसले होते. एकूण ५०० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील केवळ २५,८६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे केवळ २४.९८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत एकूण ४७,९४४ महिला परीक्षार्थी सहभागी झाल्या होत्या त्यापैकी ११,४१२ जणींना या परीक्षेत यश मिळाले आहे. या परीक्षेत एकूण ५५,५७३ पुरुष परीक्षार्थी सहभागी झाले होते त्यापैकी, १४,४४८ जणांना या परीक्षेत यश मिळाले आहे.
असे आहेत निकालाचे निकष (CA Foundation Result 2023)
आयसीएआय (ICAI) फाउंडेशनच्या निकालासाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांच्या निकालावर ‘Pass with distinction’ असा शेरा देण्यात येणार आहे. तर ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० गुण मिळवणे गरजेचे आहे. तर सीए फाउंडेशन हा पहिला टप्पा पार करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com