करिअरनामा आॅनलाईन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे.
पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विषयांचे प्रश्नसंच काढण्यापासून ते ऑनलाइन पद्धतीतील त्रुटींमुळे परीक्षेमध्ये अडचणी आल्या होत्या. या अडचणी बॅकलॉकच्या परीक्षेमध्ये येऊ नये, यासाठी विद्यापीठाने सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. बॅकलॅगच्या परीक्षेत सुमारे २ हजार २०० विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे अडीच ते पावणेतीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षा विभागाने काही दिवसांपूर्वी या परीक्षा संदर्भात परिपत्रक काढून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा सराव करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल, असेही परिपत्रकात नमूद केले होते केले होते. मात्र, या वेळापत्रकात काहीसा बदल होत आहे.
३ ते ६ डिसेंबर या कालावधीत सराव परीक्षा होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यवस्थित लॉगिन होते का? त्यांचा ई-मेल आयडी बरोबर आहे की चूक आदी गोष्टींची पडताळणी होणार आहे. यातून ज्या त्रुटी समोर येतील, त्या त्रुटी ७ डिसेंबरपर्यंत दूर करून ८ ते २३ डिसेंबर या कालावधीत परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.