करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल दि. 20 मे पर्यंत जाहीर होईल; असा अंदाज होता. मात्र आता 12 वीच्या निकालासाठी आणखी थोडेच दिवस वाट पहावी लागणार असून बारावीचा निकाल मंगळवार दि. 21 मे किंवा बुधवार दि. 22 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दीर्घ प्रतिक्षा लागून राहिलेल्या विद्यार्थी व पालकांच्या हाती लवकरच निकाल पडणार आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होईल; असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी व पालकांकडून सतत विचारणा होत आहे. राज्य मंडळाकडून निकाल जाहीर (12th Board Exam Results 2024) करण्यापूर्वी एक दिवस आधी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले जाते. आज रविवार असल्याने राज्य मंडळाला कार्यालयीन सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी दि.20 मे रोजी निकाल जाहीर होणार नाही. राज्य मंडळाच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे. तसेच अद्याप पर्यंत निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध होणार हे निश्चित आहे.
निकालाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष (12th Board Exam Results 2024)
बारावीचा निकाल येत्या 21 किंवा 22 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. पुढील दोन दिवसात निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी निकाल जाहीर होणार असेल तर राज्य मंडळाकडून सोमवारी अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले जाईल. तसेच बुधवारी निकाल जाहीर होणार असेल तर मंगळवारी पत्रक प्रसिध्द होईल. त्यामुळे राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com