करिअरनामा ऑनलाईन । शिकण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या (PMC Scholarship 2023) होतकरु विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहर महानगरपालिकेने अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. मनपाने या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद केली होती. आता त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी मनपा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. दरवर्षी या योजनेतून जवळपास १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
अर्ज प्रक्रियेविषयी….
पुणे महापालिका शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सोमवार दि. ९ ऑक्टोबरपासून स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतीम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे; अशी माहिती मनपाच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली आहे. या शिष्यवृत्ती विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या https://www.pmc.gov.in/educational-schemes/educational-schemes-en.html लिंक चा वापर करायचा आहे.
असं आहे योजनेचे स्वरुप (PMC Scholarship 2023)
पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावीचे विद्यार्थी ‘मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजने’स पात्र ठरतात. त्यांना १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजना’ आहे. या योजनेतून बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये शैक्षणिक अर्थसाह्य शिष्यवृत्ती स्वरूपात दिले जाते.
कोणाला मिळते शिष्यवृत्ती?
10 वी आणि 12 वीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिले जाते. मनपाकडे शिष्यवृत्तीसाठी आलेल्या अर्जांची सर्व अर्जाची छानणी करण्यात येणार आहे. त्यानंतर (PMC Scholarship 2023) पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. अर्ज केल्या पासून पैसे खात्यात जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पैसे जमा होणार?
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मार्च महिन्यापर्यंत शिष्यवृत्तीचे पैसे जमा न झाल्यास विद्यार्थ्यांना जून महिन्यापर्यंत वाट पहायला लागण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com