मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता १०वी (SSC board exam) आणि इयत्ता १२वीच्या परीक्षांचे (HSC Board Exam) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच १०वीच्या एप्रिल-मे २०२१ या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहेत.
एप्रिल-मे २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर १६ फेब्रवारी २०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती. या वेळापत्रकांसंदर्भात सूचना असल्यास मंडळाकडे २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लेखी स्वरुपात मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार विविध संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थ्या यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करुन इयत्ता १२वी आणि इयत्ता १०वीच्या संभाव्य वेळापत्रक अंतिम करण्यात आलेली आहेत.
10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार
नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.