करिअरनामा विशेष । ‘जैवविविधता’ (Biodiversity) या संकल्पनेवर आजचा जागतिक पर्यावरण दिन हा मोठ्या उत्साहात जगभर दरवर्षी प्रमाणे साजरा होत आहे. यंदा 2020 मध्ये कोलंबिया देशाकडे ह्या दिनाचे यजमान पद असणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर जनजागृती आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन हा संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जगभर साजरा केला जातो. पर्यावरण दिन पर्यावरण संरक्षणाबाबत लोकांपर्यंत पोहचाण्यासाठीचे एक जागतिक व्यासपीठ बनले आहे.
‘पर्यावरण वाचवा’ असे ओरडून ओरडून सांगण्याची वेळ ही आपल्याच ( मानवी) अतिरेकी व अवाजवी भूमिकेमुळे निर्माण झाली आहे. सध्या पेट्रोलचे भाव वाढूनसुद्धा आपल्या बाईक वापरण्याच्या सवयीवर कुठेही परिणाम झाला नसून, उलट सार्वजनिक वाहनव्यवस्थेचा किंव्हा पर्यायी वाहन व्यवस्थेचा (उदा.सायकल, व इतर इकोफ्रेंडली वाहने) वापर करण्याऐवजी आपण पेट्रोलचे भाव कधी कमी होतील या चर्चेमध्येच जास्त व्यस्त आहोत. आपल्या सभोवतालचे वातावरण बघितले की खरंतर स्वतःलाच मान खाली घालावीशी वाटते. पर्यावरणाचे होणारे नुकसान, वाहनांचे धूर, प्रदूषित पाणी, हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, जंगलतोड, कार्बनची वाढती चिन्हे, जैवविविधतेचा ऱ्हास, कचरा ( ई- कचरा, घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, वैद्यकीय कचरा ), आम्लयुक्त पाऊस (Acid Rain) इत्यादी या समस्या आपल्या सभोवताली कुठे ना कुठे तरी निर्माण होतांना दिसताय. आपल्या राज्याचा विचार केल्यास चंद्रपुर येथील उच्च तापमान तर पुणे, औरंगाबाद, मुंबई येथील डंपिंग ग्राउंड प्रश्न हे दिवसेंदिवस गंभीर होतांना दिसत आहेत.
अनेकदा शासकीय पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी रोपे वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम होत असतात , परंतु लावलेले झाड हे उभं राहवं या साठी फार कमी प्रयत्न केले जातात. कारण दरवर्षी असले कार्यक्रम जाहिर होतात, त्यात फक्त झाड बदलते, खड्डा मात्र तोच राहतो. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा अनेक प्रकारे नाश केला गेला आणि आता काही राष्ट्र पूर्ण विकसीत झाल्यावर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही शहरे बनविन्याच्या सध्या प्रयत्न करीत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी काय करता येईल…
‘उपलब्ध असलेल्या वस्तुंचा पुनर्वापर करणे’ ही सहज शक्य गोष्ट पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाला निश्चित जमण्यासारखी आहे. जिथे जिथे पुनर्वापर शक्य असेल तिथे तिथे तो झालाच पाहिजे. जसे प्लास्टिक बॅग वापरण्यापेक्षा कापडी बॅग ह्या वापरल्या पाहिजेत. जर सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध असल्यास तिचा वापर करणे, एका व्यक्ती साठी शक्यतो चारचाकीचा वापर न करणे, कचरा व्यवस्थानामध्ये ओला कचरा व सुका कचरा यांचे योग्य वर्गीकरण करुण आपण त्याची नीट विल्हेवाट लावू शकतो, सण-उत्सव हे पूर्णपणे पर्यावरणपूरक साजरे करणे, अंघोळीसाठी गरम पाण्याची गरज दररोज असेल व मोठे कुटुंब असल्यास सौरबंबचा वापर करने, घरातील किंव्हा कार्यालयातील दिवे, पंखे आवश्यकता नसल्यास लगेच बंद करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करने, एका झाडाला दत्तक घेवून त्याची नीट देखभाल करणे… असे अनेक प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावू शकतो.
आपल्या देशात तरुणाईची संख्या अधिक असल्याने या कार्यगटाच्या माध्यमातून जनजागृती, लोकशिक्षण, पर्यावरणाचे महत्त्व, आपल्या गरजा, पुढील धोके, पर्यायी उपाययोजना हे समाजातील विविध घटकांना नीट समजावून दिल्यास मोठ्या प्रमाणात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी तरुणाई असणे आवश्यक आहे. तरुणाईला या कामात पूर्ण तयारीनिशी उतरवल्यास भविष्यातील पिढी ही काही क्षण तरी नक्कीच सुखाचे जगू शकेन. कारण हीच तरुणाई एकीकडे निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मनसोक्त आनंद घेतांना दिसते, मोकळा श्वास घेताना दिसते.. फोटोशूट… सेल्फीत मग्न होते, परंतु हीच तरुणाई आपल्या परिसरात एखादे झाड लावतांनाचा सेल्फी, सोशल पोस्ट टाकतांना किंव्हा एखाद्या पर्यावरण बचाव मोहिमेचा सभासद होतांना दिसत नाही.
सद्यस्थितिला आपला देश प्रगतीपथावर असतांना आपण पर्यावरणांकडे डोळेझाक करुन चालणारच नाही. त्यासाठी प्रत्येकाला आपआपल्या परीने पर्यावरण संवर्धनासाठी ‘खारीचा वाटा’ उचलावाच लागेल.
– अमित येवले, जळगाव.