करिअरनामा ऑनलाईन | करोनाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये, विद्यार्थी आणि पालक शिक्षणाचा खर्च सहन करू शकत नाहीत. यामुळे, महाविद्यालयीन फी कमी झाली पाहिजे, अशी मागणी युवक क्रांती दलाने केली आहे. या मागणीसाठी गुगल फॉर्म’च्या माध्यमातून पाच हजार विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये तक्रारी केल्या आहेत. पुण्यातील पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन युवक क्रांती दलाने ही मागणी मांडली.
‘मार्च 2020 पासून देशावर करोनाचे संकट आले आहे. महाराष्ट्रात कारोणाचा मोठा प्रादुर्भाव आहे. या संकटामुळे संपूर्ण जनजीवन आणि आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. पालकांचे व्यवसाय आणि उद्योगधंदे बंद पडले आहेत. सोबतच, बऱ्याच पालकांची नोकरीही गेली आहे. गेल्या वर्षापासून, शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने होत असून, अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या साधनसामग्रीचा वापर केला नाही. तरीही, कॉलेजकडून विद्यार्थ्यांची पूर्ण फी मागितली जात आहे’ असे युवक क्रांती दलाने जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना आलेल्या शुल्कामध्ये मेन्टेनन्स शुल्क, प्रयोग शाळा शुल्क, व्यायाम शाळा शुल्क, संगणक प्रयोग शाळा शुल्क, गणवेश शुल्क, अभ्यास साहित्य, शालेय साहित्य शुल्क, इंटरनेट शुल्क, फील्ड वर्क, इतर कृती कार्यक्रम, वाहन शुल्क इत्यादी शुल्कांचा समावेश आहे. शिक्षण ऑनलाइन पद्धतीने असून, या सर्व शुल्कांचा समावेश करण्याचे काय कारण? असाही सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातो आहे. संबंधित फी लवकरात लवकर भरण्यासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा युवक क्रांती दलाकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com