करिअरनामा। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी आणि पुण्यातील मेट्रो मार्गावरील संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी 195 पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने घेतला आहे.तसेच पुण्याच्या मेट्रोसाठी सुरुवातीला मंजूर झालेल्या पदांमध्ये महिलांना संधी उपलब्ध होणार आहे.
पिंपरीतील संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि पुण्यातील आनंदनगर ते गरवारे कॉलेज अशा शहरातील सुमारे 10 किमीच्या मार्गावर पुढील काही महिन्यांत मेट्रो सेवा सुरू करण्याचे संकेत ‘महामेट्रो’ने दिले आहेत. ही सेवा सुरू करण्यापूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी विविध स्वरूपातील पदे भरणे गरजेचे असून, मेट्रोच्या संचलनासाठी 85 , तर देखभाल-दुरुस्तीसाठी 110 पदे भरण्यात येणार आहेत.
मेट्रो संचलनाच्या वेळेत स्टेशनवरील विविध कामांसाठी पदभरती केली जाणार आहे. यामध्ये स्टेशन कंट्रोलर, स्टेशन मॅनेजर, ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मनुष्यबळ, वित्त आणि भांडार यासह ऑपरेशन अँड कमांड सेंटरसाठी (ओसीसी) पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याशिवाय, प्रत्यक्ष मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी 13 ट्रेन ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. मेट्रोचे संचलन सुरू झाल्यानंतर रूळ, सिग्नल, कम्युनिकेशन, विद्युतप्रवाह अशा विभागांतर्गत देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची गरज पडणार आहे.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”