शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल . केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
सध्या राज्यभरात ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत तिथे विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि विद्यार्थी व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढत आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या शैक्षणिक वर्षांचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे. ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञांशी विचार विनिमय चालू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशीरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सध्या जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सरकारचे प्रयत्न यामुळे आपण कोरोनाच्या संकटावर मात करून भविष्यातील वाटचाल उज्ज्वल करू असा आत्मविश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.