करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष हे १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार असल्याचे या वेळापत्रकातून स्पष्ट होते आहे. या वर्षांमध्ये दिवाळी आणि उन्हाळयाच्या सुट्ट्याही कमी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी जून- जुलै च्या दरम्यान सुरु होणारे शैक्षणिक वर्ष यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता विद्यापीठ आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून १ नोव्हेंबर पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
यापूर्वी आयोगाने मार्गदर्शक सूचनांची सूची जाहीर केली होती. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्याची अंमलबजावणी करणे शक्य झाले नव्हते. आता जाहीर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होईल. पहिले सत्र हे १ नोव्हेंबर २०२० ते ४ एप्रिल २०२१ असे असणार आहे. आणि दुसरे सत्र ५ एप्रिल ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार आहे.
३० ऑक्टोबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, १ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे अशा सूचनांसहित वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी १ मार्च ते ७ मार्च या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर ८ मार्च ते २७ मार्च या कालावधीत परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २७ मार्च ते ४ एप्रिल अशी पहिल्या सत्रासाठीची सुट्टी असेल. ५ एप्रिल पासून दुसरे सत्र सुरु होईल. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट पर्यंत परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी दिली जाईल. ९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होतील आणि ३० ऑगस्ट पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात येईल. असे या वेळापत्रकात सांगण्यात आले आहे.