मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानंतर आता दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण रद्द झाले. त्यामुळे राज्यातील विविध मराठा समाजाच्या संघटनांनी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही ; तोपर्यंत एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली.
परंतु १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. मात्र, मंगळवारी आयोगाने परिपत्रकाद्वारे १ नोव्हेंबर रोजी होणारी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबर रोजी होणारी दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध केले जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले.