नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालय व UGCच्या बैठकीत मंगळवारी रात्री उशिरा घेण्यात आल्याची माहिती आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे असा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा १५ ऑगस्टनंतर होणार आहे. तसंच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेच्या निर्णयावरुन राज्यात गोंधळाची स्थिती आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गाचा धोका पाहता परीक्षा न घेण्याची भूमिका घेतील आहे, तर यूजीसीने राज्यांना परीक्षा घेण्याबाबत पत्र पाठवलं आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि परीक्षांसाठीची संसाधने याबाबत लिहित सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com