पुणे प्रतिनिधी । महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.
महापरीक्षा पोर्टलतर्फे ही परीक्षा संगणकावर घेण्यात येत होती. दरम्यान परीक्षा केंद्रावरील अनेक तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. संगणक बंद पडले, तसेच वेळेवर लॉग इन होत नव्हते अशा बऱ्याच तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन परीक्षा केंद्रावर दिसून आले नाही. सकाळी १० ते १२ या वेळेत हा पेपर होता परंतू महापोर्टलच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी परीक्षेवरच बहिष्कार टाकला आहे. विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या या भोंगळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच म्हापोर्टल बंद करा अशा घोषणा परीक्षा केंद्रावर देण्यात आल्या.