खूशखबर! राज्यातील ६ हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची १२ हजार ४०० पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन फडणवीस सरकारने १२ हजार १४० पदांची भरती केली होती मात्र वित्त विभागाने केवळ त्यातील ६ हजार पदांच्या भरतीस मान्यता दिली होती. सरकारने उरलेल्या पदांच्या भरतीसाठी कोरोना काळातील आर्थिक परिस्थितीचे कारण त्यांनी दिले होते. त्यामुळे उर्वरित पदांची भरती लांबणीवर गेली होती. नुकतेच ३ डिसेंबर ला झालेल्या बैठकीत या पदांवरील बंदी उठविण्यात आली असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे. आता पवित्र पोर्टल च्या माध्यामतून ही लांबलेली भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

वित्त विभागाने शिक्षक पद भरतीवरील ही बंदी हटवली आहे. पवित्र पोर्टलने याआधी याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामुळे आता उर्वरित ६ हजार पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. सध्या राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. १० ते २० पटसंख्या असणाऱ्या साधारण साडेसतरा हजार शाळांचे सध्या दुसऱ्या ठिकाणी समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांवरील जवळपास १० हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्याची तिजोरी वाईट स्थितीत असताना वैद्यकीय सोडून इतर कोणत्याच पदाची भरती करू नये असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पदे रिक्त असताना देखील भरतीचा निर्णय लांबण्याची शक्यता असल्याचेही म्हंटले जात आहे.

सध्या शिक्षकांना तुलनेने खूप कमी मानधनात काम करावे लागते आहे. पहिली ते आठवीच्या शिक्षकांना ६ हजार तर नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांना ९ हजार मानधनात काम करावे लागते आहे. महागाई पाहता हे मानधन तुलनेने अगदीच तुटपुंजे आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही मानधन वाढीची मागणी केली होती. मात्र अद्याप यावरही काही निर्णय झालेला नाही आहे. तूर्तास उर्वरित पदभरती पवित्र पोर्टल द्वारे होणार असल्याची माहिती समोर येते आहे.