करिअरनामा ऑनलाईन । केवळ चार एकर कोरडवाहू शेतीवर सुरु असलेला संसार. घरात खायची तोंडे सात. या भयंकर परिस्थितीत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मेहनतीची कामे करून बीडच्या दुष्काळी जिल्ह्यातील मुलगी दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. यानंतर पोलीस दलातील कर्तव्य, अभ्यास व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून केवळ पोलीस उपनिरीक्षक नाही तर अकादमीतील पहिली महिला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा मान मिळविला. मीना भीमसिंग तुपे असे या महिला अधिकाऱ्याचे नाव! बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपूर (खामखेडा) येथील शेतकरी भीमसिंग तुपे हे पत्नी शशिकला, चार मुली अन् एक मुलगा अशा कुटुंबासह राहतात. चार एकर कोरडवाहू शेतीवर सगळ्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी़
अपत्यांमध्ये मीना सर्वात मोठी असल्याने वयाच्या अकराव्या वर्षापासूनच शेतातील नांगरणी असो, पीक कापणी, निंदणी या कामांमध्ये ती वडिलांना मदत करीत असे़. शालेय साहित्याची आबळ असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेतातील कामे करून मीना तुपे यांनी डी.एड. व बी़एड.चे शिक्षण घेतले. यानंतर बीड जिल्ह्यात २०१० मध्ये झालेल्या पोलीस भरतीत पोलीस शिपाई म्हणून रुजू झाल्या. सन २०१०-११ मध्ये खंडाळा येथे पोलीस प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रांमधून उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची निवड होऊन प्रथम पारितोषिक मिळाले होते. यानंतर २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. या परीक्षेतही संपूर्ण महाराष्ट्रात महिलांमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
मीना तुपे यांचे वडील भीमसिंग हे ६५, तर आई शशिकला या ६२ वर्षांच्या आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांच्याकडून काम होत नाही. याबरोबरच तीन लहान बहिणी व भावाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. कर्तव्य व अभ्यास यांची सांगड घालून त्या या पदापर्यंत पोहोचल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबाबत भावुक होत जीवनातील संकटास कणखरपणे सामोरे जाणे गरजेचे असल्याचे तुपे सांगतात. शैक्षणिक कालावधीत शालेय साहित्य मिळत नसल्यामुळे आई-वडिलांबाबत राग यायचा. मात्र त्यावेळची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. या परिस्थितीनेच ध्येयप्राप्तीसाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती मला दिली. पोलीस अधिकारी म्हणून सामान्यांना न्याय देऊन देशसेवा करणार आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com