कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमध्ये नोकर भरतीला स्थगिती; काय आहे कारण घ्या जाणून…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकच्या सभापती व सचिव यांनी सभेत गैरकामकाज व गैर नोकरभरती केल्याने, या नोकरभरतीला त्वरित स्थगिती मिळावी, असे पत्र बाजार समिती संचालक रवींद्र भोये यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री जयंत पाटील यांना दिले. या पत्राची दखल घेत मंत्र्यांनी या नोकरभरतीला स्थगिती देत वस्तुस्थितीची चौकशी जिल्हा निबंधकांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

बाजार समितीच्या ६ डिसेंबर २०१९ या सभेची नोटीस नियमानुसार मुदतीत न देता पोस्टाने पाठविली असल्याचा उल्लेख संचालक भोये यांनी या पत्रात केला आहे. सभेत बेकायदेशीरपणे मनमानी करून व शासन नियमांचा भंग करून नोकरभरती संदर्भातील महेश वारुळे यांच्या नोकरी अर्जाचा विचारविनिमय करणे व ई-नाम योजनेंतर्गत भरती करणे, या दोन्ही विषयांसंदर्भात बाजार समितीने कोणत्याही स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात न देता, सेवायोजन कार्यालयाकडून परवानगी व याद्या न मागवता सभेच्या दिवशी अर्ज देऊन नियुक्तिपत्र दिले.

हा पणनच्या आदेशाचा भंग असून, या माध्यमातून नवीन कर्मचारी नेमून नोकरभरती घोटाळा करण्यात आलेला आहे. या भरती प्रक्रियेला त्वरित स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भोये यांनी या पत्रात केली. बाजार समिती सभापती व उपस्थित संचालक यांना अपात्र ठरवून सचिव यांना निलंबित करण्याची मागणी भोये यांनी राज्याच्या पणन मंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.