MPSC उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

मार्गदर्शक सूचना – 

1) परीक्षा उपकेंद्रात प्रवेश करताना उमेदवाराने किमान तीन पदरी मास्क लावणे बंधनकारक.

2) परीक्षा हॉलमध्ये हातमोजे, सॅनिटायझर, मास्क असलेले किट देण्यात येईल, त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षा संपेपर्यंत करायचा आहे.

3) परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सतत सॅनिटाइज करत राहणे आवश्यक आहे.

4) कोविड-१९ सदृश लक्षणे दिसून येत असल्यास संबंधित पर्यवेक्षकांना अगोदर कळवणे बंधनकारक असणार आहे.

5) उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.

6) उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा / अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी.

7) दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.

8) परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्या आदी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे.

9) शारीरिक / परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदींवरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.

10) प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास त्यासंबंधीची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवण्यची व्यवस्था करण्यात येईल.

11) परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.

12) वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर्स आदी वस्तू परीक्षा केंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.

13) कोविड- १९ विषाणू संदर्भात केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना / आदेशांचे पालन करावे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-22 नोव्हेंबर 2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार असून कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com