MHT-CET Exam – ज्या विद्यार्थांनी यंदाच्या प्रवेश परीक्षेसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा दिली होती. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएचटी-सीईटी 2025 (पीसीएम गट) च्या फेर परीक्षेची घोषणा केली आहे. दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेतील इंग्रजी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही फेर परीक्षा (MHT-CET Exam) 5 मे 2025 रोजी होणार असून संबंधित सर्व उमेदवारांनी www.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी (MHT-CET Exam) –
या झालेल्या तांत्रिक त्रुटीबाबत अनेक विद्यार्थ्यांनी अन पालकांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची तातडीने दखल घेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानंतर सीईटी कक्षाने तज्ञांच्या मदतीने प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, एकूण 21 प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.
या विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार –
एमएचटी-सीईटी 2025 (पीसीएम गट) (MHT-CET Exam ) ची परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान एकूण 15 सत्रांमध्ये राज्यभरातील 197 केंद्रांवर पार पडली. यंदा एकूण 4,64,263 विद्यार्थ्यांनी परीक्षाासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 4,25,548 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. सदर फेर परीक्षा 27 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात परीक्षेला बसलेल्या 27,837 विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. हे उमेदवार इंग्रजी, मराठी अन उर्दू माध्यमातून परीक्षेला बसले होते. त्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले आहे.